तसे पाहिल्यास जगभरात विविध धर्म, पंथाच्या विविध संस्कृती, परंपरा आनंदाने नांदताना पाहायला मिळत आहेत. जगातील अनेक भागात सुरू होणारी वर्षे, त्याचे काळ वेगवेगळे असेल, तरी जगाने इंग्रजी कॅलेंडर मान्य केले आहे. डिसेंबर हा इंग्रजी कॅलेंडरचा शेवटचा महिना. यामधील जगभरात उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे ख्रिसमस. (Christmas 2021) २५ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात ख्रिसमस डे म्हणून साजरा केला जातो.
ख्रिसमसच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जाते. हा विशेष सण येशूच्या वाढदिवसानिमित्त होतो, यामध्ये सांता मुलांसाठी भेटवस्तू आणतात. सणाच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. इतर सणांप्रमाणे नाताळच्या शुभेच्छा देताना हॅप्पी ख्रिसमस म्हणत नाही, तर मेरी ख्रिसमस म्हटले जाते. मेरी या शब्दाचा अर्थ काय आहे आणि ख्रिसमसमध्ये हॅपी ऐवजी मेरी हा शब्द का वापरला जातो? जाणून घेऊया... (Why Do We Say Merry Christmas)
मेरीचा नेमका अर्थ काय?
मेरीचा अर्थ आनंदी, सुखी असा आहे. मेरी हा शब्द जर्मनिक आणि ओल्ड इंग्लिशचा मिलाफ आहे. सोप्या शब्दात, मेरीचा अर्थ आणि हॅपीचा अर्थ एकच आहे. पण ख्रिसमसमध्ये हॅप्पीऐवजी मेरी हा शब्द वापरला जातो. मेरी हा शब्द प्रसिद्ध साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनी प्रचलित केला होता. त्यांनी त्यांच्या ‘अ ख्रिसमस कॅरोल’ या पुस्तकात मेरी हा शब्द सर्वाधिक वापरला. त्यानंतर हॅप्पीऐवजी मेरी हा शब्द वापरात आला. त्यापूर्वी लोक हॅपी ख्रिसमस म्हणायचे. इंग्लंडमध्ये आजही अनेक लोक मेरीऐवजी हॅप्पी ख्रिसमस म्हणतात. दोन्ही शब्द सारखेच आहेत पण मेरी हा शब्द प्रचलित आहे. (Origin of Merry Christmas in Marathi)
मेरी शब्दाचा इतिहास आणि उत्पत्ती
मेरी या शब्दाची उत्पत्ती १६ व्या शतकात झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी इंग्रजी भाषा बाल्यावस्थेत होती. नंतर १८व्या आणि १९व्या शतकात ते अधिक प्रचलित झाले. नाताळ सणावेळी मेरी हा शब्द हॅप्पी पेक्षा जास्त वापरण्यात आला. पण मेरी हा शब्द ख्रिसमसशिवाय अन्य कोणत्याही सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरला जात नाही. बहुतेक देशांमध्ये बहुतांश नागरिकी मेरी ख्रिसमस म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात. हॅप्पी ख्रिसमस म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. हॅप्पी ख्रिसमस आणि मेरी ख्रिसमसचा अर्थ एकच आहे.