मोबाईल आणि कॉम्प्युटर आल्यापासून आपलाच काय पण विद्यार्थ्यांचाही लेखनाचा सराव सुटला आहे. कोव्हीड काळात तर जरा जास्तच! मध्यंतरी बातमी होती, की सगळा अभ्यास संगणकीय पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यात अडचणी येत आहेत. याचाच अर्थ लेखनाशी आपण किती दुरावलो आहोत ते पहा! बालपणी किती निगुतीने हस्ताक्षर रेखाटण्याचा आपण प्रयत्न केला असेल, परंतु आता कोणी काही लिहायला सांगितले, तर कागदावर जणू काही किडा मुंग्यांची पावले उमटतील. तर काही जणांचे अक्षर एवढे वाईट येते की त्यांना स्वतःलाही वाचता येत नाही. परंतु, अजूनही काही जणांचे अक्षर अगदी मोत्याच्या दाण्यासारखे रेखीव असते. लिखाणाचा सराव असो व नसो, परंतु आपल्या हस्ताक्षरावरून स्वभाव कळतो असे म्हणतात. याचे स्वतंत्र शास्त्र आहे आणि त्याचा सखोल अभ्यास करणारे अभ्यासकही आहेत. अशाच काही गोष्टींवरून आपण आपला आणि इतरांचा स्वभाव हस्ताक्षराशी मेळ खातोय का, ते पाहूया...!
>>छोटे अक्षर स्वार्थी, निग्रही व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जाते. याउलट मोठे अक्षर नेतृत्वाचे गुण दर्शवते.
>>स्वभावाबरोबर हस्ताक्षर बदलते आणि हस्ताक्षराबरोबर स्वभाव बदलतो.
>>स्वच्छ, टापटीप हस्ताक्षर असणारी व्यक्ती तिच्या राहणीमानाबाबतही टापटीप असते.
>>ज्यांचे हस्ताक्षर ओळीच्या वर डोकावत राहते, ते लोक म्हत्त्वाकांक्षी असतात. ते आपले ध्येय जिद्दीने मिळवतात.
>>ज्यांचे अक्षर वळणदार असते, ते लोक प्रत्येक बाबतीत गोपनीयता ठेवतात आणि कधीही कोणतीही खेळी खेळू शकतात.
>>ज्यांचे अक्षर सुरुवातील मोठे आणि पुढे पुढे मुंगीच्या पावलांसारखे लहान लहान होत जाते, असे लोक अतिशय लबाड असतात.
>>ज्यांचे अक्षर सुरुवातील रेखीव आणि नंतर कोंबडीच्या पायासारखे असते, ते लोक आरंभशूर असतात. कामाची सुरुवात उत्साहाने करतात पण लगेचच त्यांचा उत्साह मावळत जातो.
>>ओळीला जोडून काढलेले अक्षर हे वक्तशीरपणा, एकनिष्ठता आणि वचनाला पक्के असण्याची खूण आहे. असे लोक अतिशय प्रामाणिक असतात.
>>ज्यांचे अक्षर सुरुवातीपासून शेवट्पर्यंत एकसारखे असते, असे लोक सरळ स्वभावाचे तसेच ईमानदार, उदार असतात.