आचार्य चाणक्य हे महान विद्वान, अर्थतज्ञ, मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात जीवनातील व्यावहारिक पैलूंबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये स्त्रिया आणि पुरुषांचे चारित्र्य, गुण आणि अवगुण याबद्दलही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चाणक्य नीतीनुसार महिलांमध्ये असे काही गुण असतात, ज्यामध्ये त्या पुरुषांपेक्षा खूप पुढे असतात. या बाबतीत पुरुष त्यांना कधीही हरवू शकत नाहीत. यामुळेच महिला या बाबतीत पुरुषांपेक्षा वरचढ ठरतात.
धाडस: चाणक्य नीतीनुसार पुरुषांसमोर स्त्रियांची प्रतिमा दुर्बल व्यक्तीची असली तरी वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की संकट काळात न डगमगता पुरुषांपेक्षा मनाने स्त्रिया जास्त स्थिर असतात. पुरुष पटकन खचून जातात, स्त्रिया निर्भयपणे प्रसंगाला सामोऱ्या जातात, आव्हान स्वीकारतात आणि जबाबदाऱ्या पार पडतात. म्हणून सजीव निर्मितीचे दान समस्त चराचरातल्या स्त्रीत्त्वाला नियतीने प्रदान केले आहे.
बुद्धी: स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक हुशार असतात. त्या प्रत्येक मुद्द्यावर बारकाईने विचार करून निर्णय घेतात. निर्णय प्रक्रियेत त्यांच्या सिक्स्थ सेन्सची सुद्धा त्यांना मदत होते. याउलट पुरुष रागाच्या भरात अनेकवेळा चुकीचे निर्णय घेतात आणि त्यांचे मोठे नुकसान होते. तर महिला या बाबतीत संयमाने आणि हुशारीने काम करतात. वाढत्या वयानुसार त्यांची निर्णय क्षमताही वाढत जाते.
वात्सल्य : नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये वात्सल्य भाव असतोच. पुरुषांच्या तुलनेत त्या पटकन भावुक होतात आणि समोरच्याला क्षमा करतात. मात्र हा गुण स्त्रियांची दुर्बलता मानण्याची चूक करू नये. कारण त्या गौरीसारखे शीतल रूप धारण करत असल्या तरी क्षणात चंडिका होण्याचे सामर्थ्यही बाळगतात. म्हणून त्यांना गृहीत धरू नये.