वाईट लोकांच्या, विचारांच्या सान्निध्यात राहून आपण आपला मूळ स्वभाव, संस्कार विसरतो. इतरांसारखे आपणही वाईट वर्तन करू लागतो. आपली बुद्धी, कृती बिघडते आणि आपणही वाईट बनतो. म्हणून नेहमी आपली संगत तपासून पाहा.
गोष्ट आहे परीक्षित राजाची. राज्यकारभारातील नियमांची सुसूत्रता, ऋषीमुनींबद्दल अतिशय आदरभावना, प्रजेबद्दल कळवळा यामुळे त्याची कारकीर्द उत्कृष्ट रीतीने सुरू झाली, वय तसे लहानच आणि अनअनुभवी.
एक दिवस त्याच्या काय मनात आले कुणास ठाऊक? राजाने एकट्यानेच शिकारीला जाण्याचे ठरवले. महालामधील एका दालनात उंच जागी एक मुकुट ठेवलेला होता. त्याची कला-कुशलता आवडली म्हणून राजाने तो खाली काढून घेतला व गंमत म्हणून स्वत:च्या डोक्यावर ठेवून राजा निघाला.
परंतु खूप भटकूनसुद्धा शिकार मिळाली नाही. राजाला कंटाळा आला, मन उगाचच अस्वस्थ झाले. कुणाशी थोड्याफार गप्पा तरी माराव्या म्हणून राजा इकडे तिकडे पाहू लागला. तिथे वस्ती अशी नव्हतीच. परंतु कुणीतरी एक मुनी ध्यानस्थ बसले होते. त्यांच्यापर्यंत जाऊन पाहोचताच राजाचे मन विनाकारण अधिकच प्रक्षुब्ध जाले. तरीही मनावर संयम ठेवीत त्याने मुनींना हाका मारावयास सुरुवात केली. चार पाच हळुवारपणे हाका मारुनसुद्धा काहीच हालचाल नाही. म्हणून तो अधिकच खवळला. त्याने आजूबाजूला पाहिले. दूरवर चार पाच मुले खेळत होती व दुसऱ्या बाजूला एक भला मोठा साप मरून पडला होता. राजाने तो उचलला आणि त्या मुनींच्या गळ्यात अडकवून दिला व रागाने ताडताड पावले टाकीत तो राजवाड्यात परतला.
थोड्या वेळाने त्या महान मुनींची समाधी उतरली. गळ्यामध्ये सापाचे लोढणे पाहून ते चमकले. अंतर्ज्ञानाने त्यांच्या सर्वकाही लक्षात आले. तो साप काढून ते सरळ राजवाड्यात आले. यापूर्वी ते कितीतरी वेळा आले होते त्यामुळे राजा त्यांना ओळखत होता. तो साप ह्यांच्याच गळ्यात आपण टाकला होता हे पाहून राजा चपापला. आता त्याच्या डोक्यावर मुकुट नव्हता.
अतिशय खजिल होऊन त्याने त्यांचे पाय धरून अशी कशी बुद्धी भ्रष्ट झाली असे विचारले. डोळे मिटून त्याला दोन्ही हातांनी उठवीत, शांत स्वरात ते म्हणाले, राजा तू खरोखरच चांगला आहेस. परंतु जो मुकुट तू डोक्यावर चढवला होतास तो कुणाचा होता माहित आहे का? भीमाने जेव्हा दु:शासनाची मांडी चिरली तेव्हा त्या दुष्ट, अहंभावी वृत्ती असलेल्या त्याच्या डोक्यावरील मुकुट शौर्याचे प्रतीक म्हणून भीम घेऊन आला होता आणि तो कोणी वापरू नये म्हणून प्रथमपासूनच उंचावर ठेवला होता; तुला पूर्वजांचे शौर्यस्मरण राहावे म्हणून! राजा या कुसंगतीचा परिणाम तुला सावध राहावयास शिकवत आहे.
म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
जयाचेनि संगे समाधान भंगे,अहंता अकस्मात येऊनि लागे,तये संगतीची जनी कोण गोडी,जिये संगतीने मती राम सोडी।