ज्योत्स्ना गाडगीळ
रामसेतू आजही इतिहास संशोधकांपासून आध्यात्मिक क्षेत्रातील समस्त मंडळींसाठी कुतुहलाचा विषय आहे. रामसेतूशी निगडीत अनेक रोचक कथा वाचायला आणि ऐकायला मिळतात. तशीच एक छान कथा आहे, रामसेतूचे स्थापत्यकार म्हणून ज्यांनी भूमिका बजावली, त्या नल आणि नील या बंधूद्वयींची!
सीतेच्या शोधार्थ लंकेवर चाल करून जाताना रामाला अथांग समुद्राचा अडसर आला. एकट्या हनुमंताच्या खांद्यावर बसून राम आणि लक्ष्मण सहजपणे लंकेत पोहोचले असते. परंतु सबंध वानरसेना समुद्राच्या तीरावर खोळंबली असती. धर्मयुद्धासाठी मनाची एवढी तयारी करूनही केवळ समुद्र पार करता न आल्याने आपण युद्धात सहभागी होऊ शकलो नाही, याची त्यांना खंत वाटली असती. शिवाय रावण आणि त्याच्या सैन्याशी युद्ध करायचे म्हटल्यावर रामालासुद्धा वानरसेनेची निकड भासली असती.
यावर उपाय म्हणून रामाने सागराला आवाहन केले. तीन दिवस सागरतटाशी बसून समुद्र देवतेला मार्ग मोकळा करून द्यावा अशी प्रार्थना केली. रामाची पूजा मान्य होईल आणि काहीतरी मार्ग निघेल या प्रतिक्षेत वानरसेना आशेवर होती. परंतु, नुसत्या प्रार्थनेत वेळ वाया जात असल्याने आणि दिवसेंदिवस सीतेचा विरह सहन होत नसल्याने रामाने आपल्याजवळील सर्वात प्रभावी ब्रह्मास्त्र सोडण्याचा निर्णय घेतला.
ब्रह्मास्त्र सोडण्यासाठी राम सिद्ध झाले, तो समुद्रातून देव प्रगट झाले आणि त्यांनी हात जोड ब्रह्मास्र सोडून प्रलय आणू नये, अशी विनंती केली. शिवाय दोन उपाय सांगितले. पहिला म्हणजे त्यांच्या सेनेत नल आणि नील नावाचे दोन भाऊ आहेत. ते बालपणी अत्यंत खोडकर होते. ऋषीमुनींना त्रास देत त्यांच्या वापरातल्या गोष्टी नदीत फेकून देत असत. त्यांच्या या खोड्यांना कंटाळून ऋषींनी त्यांना शाप दिला, तुम्ही पाण्यात टाकलेल्या वस्तू पाण्यात बुडणार नाहीत, तर पाण्यावर तरंगत राहतील.
नल आणि नील यांना मिळालेला शाप रामसेतू बांधणीसाठी वरदान ठरेल. त्यांनी समुद्र तटावरील दगडांवर श्रीराम लिहून समुद्रात दगड टाकावा. तो आपोआप तरंगत वर येईल आणि त्यांच्या हातून बांधला गेलेला सेतू दृढ ठेवण्यासाठी मी सहकार्य करेन.
रामाने समुद्र देवाला अभिवादन केले आणि दुसरा उपाय कोणता हे विचारले. त्यावर समुद्र देव म्हणाले, `हे कार्य पूर्ण होईपर्यंत आपण शिवलिंग प्रस्थापित करून कार्यसिद्धी होण्यासाठी पूजा करावी.
असे बोलून समुद्र देव गुप्त झाले. वानरांनी जल्लोष केला आणि नल व नील या द्वयींनी रामकार्यात आपल्याला एवढे चांगले काम करायला मिळत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला. वानरसेना कामाला लागली. नल व नील श्रीरामाचे नाव लिहून समुद्रात दगड टाकत गेले. दगड तरंगत गेले आणि पाहता पाहता या तीरापासून त्या तीरापर्यंत जोडणारा दगडांचा भरभक्कम सेतू बांधला गेला.
त्यावेळेस रामाने शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ज्या शिवलिंगाची पूजा केली, ते शिवलिंग आज रामेश्वर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.