- शैलजा शेवडेडॉ. सिग्मंड फ्राईड, जागतिक स्तरावरचे मानसशास्त्रज्ञ. त्यांचा सिद्धांत, ‘काम’ हीच मानवी जीवनातील एकमेव प्रेरणा असून, ती नीट व्यक्त आणि तृप्त होणे यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. पण आपले सामाजिक नियम, बंधने यामुळे कामवासना दाबून टाकणे भाग पडते. हे चुकीचं आहे. नैतिक, धार्मिक कल्पना झुगारून त्या जागी नव्या नीतीची स्थापना केली पाहिजे. कामवासना नीट, व्यक्त, संचालित आणि तृप्त करणे हे एकमेव ध्येय पाहिजे.पण खरंच कामवासना भोग देऊन तृप्त होतील का कधी?भगवद्गीतेत अर्जुन श्रीकृष्णाला याबद्दलच विचारतो,सांग मला रे, हे हृषीकेशा, का जन पापे करती?कुठली प्रेरणा बळजोरी ती, भाग तया पाडिती?योगेश्वर अन् तत्त्वदर्शी जे हृदयकमली राहती,श्रीकृष्ण भगवान अर्जुना समजावून सांगती।जाणून घे तू, ती प्रेरणा जी भोगाची तृष्णा,रजोगुणातून उद्भवलेली अधाशी कामवासना।तृप्तीच्या मार्गात जर का अडथळे येती,धारण करते रूप क्रोधाचे, वैरी खरोखर ती।अग्नि धुराने, धुळीने आरसा आच्छादिला जातो,अथवा गर्भ वारेने जसा गुरफटला जातो।कामरूपी जो अग्नि, भोगे कधी न तृप्त होतो,नित्यवैरी तो हे कौंतेया, ज्ञानास तसा झाकतो।काय आहे आपले खरे रूप? डॉक्टर सिग्मंड फ्राइड म्हणतात तसे कामवासनेचे भेंडोळे आहे का? भोगतृष्णा हीच आपली मूलभूत प्रेरणा आहे का? तर अजिबात तसे नाही. उलट तिला भगवंतांनी वैरी समजले आहे. तिच्यावर काबू मिळविता येतो. भोग घेण्यासाठी केविलवाणे धडपडणे हीच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता नाही. म्हणून भगवान सांगतात,‘नियमन कर तू इंद्रियांचे भरतश्रेष्ठ अर्जुना,नष्ट कर तू हे कौंतेया, पापरूपी कामना’इंद्रियांवर ताबा मिळवून भोगतृष्णेवर विजय मिळवला की आपले चिदानंद रूप समोर येते. आपण तेच आहोत.
coronavirus: भोगतृष्णा : कामवासना भोग देऊन तृप्त होतील का कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 3:59 AM