- विजयराज बोधनकरएकदा एका गावात खूप जुना महाकाय वृक्ष वादळ-वाऱ्यामुळे उन्मळून पडला. गावकऱ्यांनी गरजेप्रमाणे त्याची विल्हेवाट लावली. गावातल्या एका कलावंत शिल्पकार असलेल्या सुताराने मात्र मोठ्या आकाराचा लांब जाडजुड ओंडका कापून घरी आणला. पुढे त्याने त्याचे दोन तुकडे केले आणि एका ओंडक्यातून काही दिवसांतच देवाची एक सुंदर मूर्ती बनवून देव्हा-यात स्थापना केली. भक्तिभावाने पूजा सुरू झाली. दुसरा ओंडका मात्र बराच काळ तसाच पडून राहिला. कधीतरी, काहीतरी करू अशा भावनेतून आणि आळसामुळे तो ओंडका दुर्लक्षित राहिला. बराच मोठा काळ निघून गेला. एक दिवस तो पडून असलेला दुर्लक्षित लाकडी ओंडका सुताराच्या मुलाने कु-हाडीने फोडून इंधन म्हणून जाळून टाकला, ज्या ओंडक्यात कलाकृती निर्माण करण्याची क्षमता होती. एका ओंडक्यातून देव जन्मला, तर दुस-या ओंडक्याची राख झाली. खरे तर एकाच झाडाचे दोन तुकडे होत; पण लक्ष आणि दुर्लक्ष यातून ही रूपक कथा खूप काही सांगून जाते. माणसाचे आयुष्यही असेच आहे. बºयाचदा आपलंच आपल्याकडं दुर्लक्ष होतं. माणसाला निसर्गानं स्वत:ची प्रगती करण्यासाठी सर्व महत्त्वाचे घटक बहाल केले; पण आळस, दुर्लक्ष, आत्मविश्वासाचा अभाव, न ऐकून घेण्याची मानसिकता, चांगले-वाईट समजून न घेण्याची प्रवृत्ती अशा दोषांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी निसर्गाने दिलेल्या आंतरिक क्षमता कुजून जातात. ज्याप्रमाणे दुर्लक्षित ओंडक्याचे इंधन करून चुलीत जाळण्यात आलं, त्याप्रमाणं स्वत:कडं दुर्लक्ष करून माणूस आपलं सरपण करून घेतो; पण जे लक्षपूर्वक आयुष्य आपल्या कर्मातून उभं करतात, त्यांना समाज मनाच्या देव्हाºयात स्थान देतो. त्या कुशल सुतारात लाकडामधून मूर्ती बनविण्याची अंगभूत क्षमता होती. त्यामुळेच त्याने लाकडातून सुंदर अशी मूर्ती बनविली; पण एका ओंडक्याकडे त्याचेच दुर्लक्ष झाल्यामुळे त्या ओंडक्याला चुलीत जळावं लागलं, शेवटी दुर्लक्ष हेच दुर्भाग्य असतं.
coronavirus: दुर्लक्ष हेच दुर्भाग्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 1:14 AM