आज गोकुळाष्टमी आणि उद्या दहीहंडी! हा केवळ उत्सव नाही तर राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा सण आहे. त्याच्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. आज जे दहीहंडीचे थर लावले जातात, ते तरुणांना संघटित करून एकमेकांच्या मदतीने मानवी मनोरे बांधून यशाचे लोणी खाण्याचा संदेश देतात. त्यासाठी कष्ट उपसावे लागतात, मगच बक्षिसरुपी नवनीताची गोडी चाखता येते. हाच संदेश श्रीकृष्णाने बाळगोपाळांनाही दिला, तो असा -
मथुरेस आपल्या पित्यास कैद करून स्वत: राजगादीवर बसणाऱ्या कंसाच्या जुलमी, नितीभ्रष्ट व धर्मबाह्य सत्तेमुळे त्यावेळची प्रजा त्रस्त झाली होती. राजाचे सेवकही पिडा व त्रास देण्यात मशगुल झाले होते. गोकुळातील गौळणींनी मथुरेस विकण्यासाठी नेलेले दूध, दही, तूप, लोणी असा सकस, शक्तीवर्धक खुराक खाऊन कंसाचे मल्ल बलवान झाले होते व सर्व गोपाळ अशक्त होत चालले होते.
म्हणून भगवंताने शत्रूची शक्ती कमी व्हावी व आपली संरक्षण शक्ती बळकट व्हावी म्हणून रस्त्यावर उभे राहून गोकुळातील दही, दूध, लोणी मथुरेस विक्रीकरीता जाण्यास बंदी घातली व गोपाळांची संघटना करून त्यांना विचारले, तुम्ही असे अशक्त का?
गोपाळ म्हणाले, `आम्हाला ताकाशिवाय काही मिळत नाही.'तेव्हा भगवंताने त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याच घरचे दही, दूध, लोणी, तूप चोरी करून खाऊ घातले. अशाप्रकारे आपली शक्ती वाढवण्यासाठी व दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी भगवंताने ही योजना आखली होती. कारण आपत्कालिन राष्ट्ररक्षणाकरता स्वारी तथा चोरी दोष नाही. या न्यायाने भगवंताने चौर्यकर्म आरंभले. गोपाळांचे संघटन करून मानवी मनोरे बांधले आणि सर्वांना धर्मनितीचे शास्त्र शिकवले.
गोकुळातील गौळणी आपल्या मुलांना दही, दूध, तुप, लोणी न देता त्या विकत असत. हा त्यांच्याकडून अधर्मच घडत होता. तसेच ज्याच्या कृपेने हे प्राप्त झाले, त्या देवास अर्पण न करता त्या विकावयाच्या. शास्त्र असे सांगते, देवाला अर्पण न करता जो जे काही सेवन करतो तो पाप सेवन करतो व देवाचे हिरावून घेणारा चोर आहे, असे भगवान गीतेत कर्मयोगात सांगतात. तेव्हा या अर्धमाचे मार्जन निर्मूलन होऊन त्यांच्याकडून धर्मपालन व्हावे या हेतूने धर्मरक्षणार्थ आलेले धर्ममूर्ती भगवान कृष्ण चोरी करत असत.