परमार्थ करणे म्हणजे कर्मकांड करणे असा संकुचित अर्थ घेतल्यास सोन्याला पिवळा धातू म्हणण्यासारखे आहे. म्हणून परमार्थ या शब्दाचा व्यापक अर्थ आपण पाहू. शब्दाच्या व्युत्पत्तीप्रमाणे परम अर्थ म्हणजे अतिश्रेष्ठ उच्चकोटीचे प्रयोजन असा अर्थ होतो. म्हणून परमार्थ म्हणजे परब्रह्माशी एकरूप होण्याचा मार्ग असा अर्थ होतो. परमार्थ करणे म्हणजे परमार्थाचे आचरण, चिंतन आणि अनुभूती असा व्यापक अर्थ होतो.
दिवसातून मिळेल तेवढ्या अल्पस्वल्प वेळात जमेल ती पूजा, वाचन करणे व समाजात आपल्या संपर्कात येणाऱ्या प्राणीमात्रांवर जास्तीत जास्त उपकार करणे, हे परमार्थाचे खऱ्या अर्थाने आचरण होय. थोडा जरी फुरसतीचा वेळ मिलाला, तरी इष्टदेवतेचे नमस्मरण करणे हे परमार्थचिंतन होय. इतरांच्या सुखदु:खाच्या सहवेदना समजून घेणे, त्यांच्यात ईश्वरी भाव पहाणे ही परमार्थाची अनुभूती होय. याखेरीज स्वत: उपाशी राहून समोरचे ताट दुसऱ्या भुकेल्या माणसाला देने, रक्तदान, नेत्रदान, देहदान करणे या कृती करताना मनाला होणाऱ्या सुखात परमार्थाची अनुभूती जरूर येते.
याखेरीज अनाथ, दु:खी, निरागस बालकांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांना खाऊ देने, निराश्रित अबलांना बहिणीप्रमाणे वागवणे, दीन दुर्बलांना मदतीचा हात देणे या कृती करतानाही परमार्थाची अनामिक अनुभूती येते.
याचाच अर्थ परमार्थ साधण्यासाठी घरदार सोडून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. दिवसातून मनाविरुद्ध वेळ काढून देवासमोर देहाने तासन तास पूजा करत बसण्याचीही गरज नाही. घरात एखादी मूर्ती ठेवून स्नानोत्तर जमल्यास षोडशोपचारे वा पंचोपचारे पूजा करून सत्पुरुषाचे चरित्र जमेल तेवढे वाचून आपल्या कामाला लागणे आणि वरील पद्धतीने सदाचरण करणे हाही परमार्थच आहे!
परमार्थाची सुंदर व्याख्या तुकाराम महाराज सांगतात-
नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची ।।
नलगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण ।।
ठायीच बैसोनि करा एकचित्त,आवडी अनंत आळवावा ।।
तुका म्हणे सोपे, आहे सर्वाहूनी शहाणा तो धनी घेत असे ।।