माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंधाची निर्मिती समर्थ रामदास यांनी निर्मिती केली. म्हणून ही तिथी दासबोध जयंती (Dasbodh Jayanti 2024) म्हणून साजरी केली जाते. या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे. आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात. ते अमुक एक दिवशीच सुरु करावे असा नियम नाही, मात्र जेव्हा केव्हा वाचन कराल तेव्हा त्यातील प्रत्येक शब्दाचे चिंतन करायला हवे. तरच त्या ग्रंथवाचनाचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकेल. आता जाणून घेऊ की दासबोधात नेमके दडलेय तरी काय?
दासबोधाची माहिती:
समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. १७ व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. संसार कसा करावा, संसार कसा असावा, याचे नेमके ज्ञान दिले. सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र रामदासांनी दिला आहे. मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात, याचे ब्रह्मज्ञान रामदासांनी सकलजनांना दिले.
दासबोधाची रचना
दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात १० समास आहेत. यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती-पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. समर्थांनी दोन वेळा दासबोधाची निर्मिती केली असे म्हटले जाते. पहिला दासबोध ग्रंथ २१ समासाचा होता आणि नंतरचा दासबोध २०० समासी असल्याचे सांगितले जाते. जुन्या आणि नंतरच्या दासबोधाचे एकत्रिकरण करून त्यावर संपादकीय संस्कार करून अनेक प्रकाशकांनी दासबोधांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या. दासबोधात सर्व अध्यात्मिक ग्रंथांचे सार आहे, असेही म्हटले जाते.
दासबोधाची वैशिष्ट्ये
गुरु-शिष्य संवाद असे दासबोध ग्रंधाचे स्वरुप असून, पारंपरिक पद्धतीने केले जाणारे गणेश वंदन, सरस्वती वंदन, गुरू वंदन दासबोधात आढळत नाही. हा ग्रंथ कोणता, त्याचे नाव काय, या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे, या ग्रंथामुळे काय मिळेल, अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभी येतात. दासबोधातून रामदासांनी निश्चयात्मक आणि विवेकपूर्ण लिखाण केल्याची प्रचिती प्रत्येक समासात येते. मूर्खांची लक्षणे, नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे. दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे.
दासबोधातील दशकांची नावे
स्तवनाचा दशक, मूर्खलक्षणांचा दशक, स्वगुण परीक्षा, नवविधा भक्ती, मंत्रांचा दशक, देवशोधन, चौदा ब्रह्मांचा दशक, मायोद्भवनाम ज्ञानदशक, गुणरूप दशक, जगज्जोतिनाम दशक, भीम दशक, विवेक वैराग्य दशक, नामरूप दशक, अखंड ध्याननाम दशक, आत्म दशक, सप्ततिन्वयाचा दशक, प्रकृती पुरुष दशक, बहुजिनसी दशक, शिकवण दशक आणि पूर्ण दशक. या दशकांच्या केवळ नावावरून समर्थ रामदास स्वामींनी मानवी जीवनाचा आणि मानवी मनाचा किती सखोल अभ्यास केला आहे, याची प्रचिती येते. आजच्या काळातही समर्थ रामदासांची शिकवण किती तंतोतंत लागू पडते, याचा प्रत्यय येतो. मनाचे श्लोक रचणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा उल्लेख केवळ ग्रंथराज असाच करता येईल.