Dasnavmi 2024: माघ वद्य नवमीला तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ ' हा घोष करून समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. हाच दिवस दासनवमी म्हणून ओळखला जातो. यंदा २०२४ रोजी ०५ मार्च रोजी दासनवमी आहे. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते, असे सांगितले जाते. रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले. एके दिवस आपल्या मठात शिष्यांसोबत बसलेले असताना एका प्रसंगात समर्थांनी देवाकडे मागणे मागण्याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले.
आपण देवाकडे सातत्याने काही ना काही मागत असतो. आपली सुख-दुःखे देवाला सांगत असतो. आपल्या समस्या, अडचणी यातून मार्ग दिसावा, यासाठी देवाकडे आर्जव करत असतो. देवाकडे मागण्याची योग्य पद्धत कोणती, याबाबत समर्थ रामदास स्वामी यांनी काही मार्गदर्शन केले आहे. समर्थ रामदास स्वामी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करत असत, तेव्हा त्यांची मुद्रा ही अगदी स्थितप्रज्ञासारखी असे. एकदा न राहून एका शिष्याने समर्थांना विचारेल की, नामस्मरण करत असताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो? आपण जराही विचलित होत नाहीत? मनात नेमका काय विचार करीत असता? मनातील विचारांचा लवलेश चेहऱ्यावर येत नाही हे कसे शक्य होते? असे प्रश्न शिष्याने समर्थांना केले.
समर्थ रामदास स्वामींनी शिष्याला एक गोष्ट सांगितली
समर्थ रामदास स्वामी उपस्थित शिष्यांना एक गोष्ट सांगितली. एकदा एका राजमहालाबाहेर एक भिक्षुक उभा होता. भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल, इतकेही वस्त्र नव्हते. आहे त्या वस्त्रालाही अनेक ठिकाणी चिंध्या जोडलेल्या होत्या. अनेक दिवसांपासून भिक्षुक जेवलेला नसावा, हे स्पष्ट दिसत होते. मात्र, भिक्षुकाच्या डोळ्यात तेज होते. कष्ट सोसलेला भिक्षुक उभा तरी कसा राहू शकत होता, याचे आश्चर्य वाटत होते. केव्हाही खाली कोसळेल, अशा स्थितीत तो ताटकळत उभा होता. तेवढ्यात सम्राट बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले की, सांग, तुला काय हवे आहे?
मी ईश्वराला अधिक काय सांगायचे?
भिक्षुक उत्तरला की, आपल्या द्वारावर माझ्या ताटकळत उभे राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल, तर यावर मला काहीही बोलायचे नाही. मी आपल्यासमोर आहे. माझी मागणी काय असू शकेल, याचा आपणच अंदाज बांधलेला बरा. माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे, असे भिक्षुकाने सांगितले. पुढे समर्थ रामदास स्वामी म्हणाले की, तो प्रसंग पाहून, देवाकडे काहीतरी मागायचे सोडून दिले, असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले. मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे. परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल. याउपर मी ईश्वराला अधिक काय सांगायचे? माझी परिस्थिती सर्व काही कथन करू शकत नसेल. तर माझे शब्द ती सांगायला कसे पूरे पडू शकतील? माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाहीत, तर माझे शब्दही त्यांना कसे उमगतील? म्हणूनच भावपूर्ण विश्वासातून परमात्म्याचे केलेले नामस्मरण महत्त्वाचे ठरते. यानंतर काहीच मागणे शिल्लक राहत नाही. आपण करत असलेली प्रार्थना, मनापासून केलेले नामस्मरण पूरेसे असते, असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले.