>> गणेश कुलकर्णी
"अंतःकरण असता पवित्र! सदाकाळ वाचावे गुरूचरित्र!!
कोणतेही अध्यात्मिक कार्य तसेच उपासना नामस्मरण नामसंकीर्तन भजन पूजन भक्ती ही त्याविषयी मनात जेंव्हा तळमळ निर्माण होईल त्या वेळी कुठलेही शुभसंकेत न पाहता तत्काळ प्रारंभ करावेत कारण....
"शुभस्य शीघ्रं अशुभस्य काल हरणम्"
आपली भूमी ही मृत्यूभूमी आहे. इथे जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यूच्या अधीन व्हावेच लागते. भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात....
"जातस्यहि धृवो मृत्यू, धृवं जन्म मृतस्य च"
म्हणूनच एक संत वचन आहे की..
नाही देहाचा भरवसा!कोण दिवस येईल कैसा?!!
त्यातल्या त्यात आपल्या मनात गुरूंच्या सेवेविषयी तीव्र तळमळ ओढ आणि नम्रभाव असेल तेव्हा कुठल्याही ग्रंथाचे पारायण केले तरी चालते.फक्त त्या ठिकाणी सात्विक भाव निर्माण होईल असे वातावरण, पवित्र देह आणि शुद्ध सात्विक आहार विचार उच्चार आणि मनाची प्रसन्नता शांतता एकाग्रता असलीच पाहिजे तर त्या पारायणातून परमेश्वराच्या दिव्य लहरी त्या ठिकाणी फिरू लागतात आणि त्या तेथील सर्वांना उत्साह प्रेरणा बुद्धी ज्ञान वैराग्य प्रेम आणि आनंद प्राप्त करून देतात आणि त्या साधकाचा,भक्ताचा गुरूंच्या विषयी सेवा मार्गाचा प्रवास प्रारंभ होतो.आणि जर वर सांगितलेल्या प्रमाणे कुठले पावित्र्य नियम जर न पाळता "लोकांनी आपल्याला कुणी तरी महान संत समजावे, सन्मान करावा, आपल्या आज्ञेत वागावे" या उद्देशाने पारायण केले तर ते पारायण होत नाही तर आपल्यामधे अहंकार गर्व अज्ञान पाखंडी पणा भरण्याचा एक उपक्रम होतो!
पारायण या शब्दाचा अर्थ...."सदैव रत तल्लीन, एकनिष्ठ आणि अखंड भक्तीत रममाण होणे" असा आहे.
आपण जेवायला बसताना आपले जेवणाचे ताट स्वच्छ आहे का? हे पाहूनच जेवणाचा खरा आनंद घेतो आणि जर कसे तरी वातावरण, अपवित्र अस्वच्छ जागा तसेच अस्वस्थ परिस्थितीत अन्न भक्षण केले तर मन तृप्त होईल का? शरीराला आरोग्य मिळेल का? अशा प्रकारे या शास्त्राचा विचार करून कुठल्याही ग्रंथाचे पारायण करावे. आपल्याला प्रपंच सांभाळून जेवढे शक्य होईल तेवढे नियम पाळावेत! शेवटी "नियम" कालमानाप्रमाणे बदलत राहतात पण "यम" कधीच बदलत नाही हे आपण प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे जाणून घेतले आहे.
शेवटी एकच विनंती शरिराला क्लेश देऊन आणि दुसऱ्यांवर छाप पडावी म्हणून केलेली कुठलीही उपासना भक्ती ही कधीही यशस्वी होत नाही तर ज्या वेळी जो कोणी परमेश्वराचे नामस्मरण नामसंकीर्तन भजन पूजन भक्ती उपासना चिंतन शुद्ध सात्विक पवित्र भावनेने करतो तीच शुभ घटिका तेच खरे लग्न (शुभ मुहूर्त) तेच सर्व ग्रहांचे बळ मानले जाते.
"तदेव लग्नं सुदिनं तदेव!ताराबलं चन्दबलं तदेव!!विद्याबलं दैवबलं तदेव!लक्ष्मीपती ते मनसा स्मरामि!!हरि ॐ तत् सत्
अशी पारायण सेवा भक्ती उपासना करणाऱ्या सर्व भक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम!