Shree Guru Charitra Parayan Datta Jayanti 2024: मार्गशीर्ष मासारंभ सुरू झाला आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. या महिन्यात गंगास्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे, तसेच दान-धर्म करून पुण्यसंचय करावा, असे म्हटले जाते.
भक्तीभावाला, परमार्थाला, आत्मचिंतनाला पुरक अशा या महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते. त्यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे.
या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे, याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे.
प.पू. टेंबेस्वामी महाराज सांगत असत, की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही, तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो. तर काही जण तीन दिवसांचे पारायण करतात. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि तीन दिवसांचे पारायण असल्यास किती अध्यायांचे वाचन करावे, याची माहिती गुरुचरित्र ग्रंथांत दिलेली असते. यासह काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक मानले गेले आहे. नेमके काय करावे आणि काय करू नये? जाणून घेऊया...
नियम लक्षात आणि आचरणात नक्की आणा
१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे.
२. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आन्हिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते, त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून, त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे, असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले, तरी श्रीदत्तात्रेयदेवता प्रीत्यर्थ किंवा श्रीदत्तात्रेयदेवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा.
३. यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. वाचनापूर्वी संध्या व १०८ गायत्री जप अवश्य करावा.
४. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे.
५. वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये.
६. श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
७. पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी.
८. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे.
९. वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे.
१०. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा.
११. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी.
१२. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत होऊन सोवळ्यानेच करावे.
१३. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ खाऊ नये. पोळी, तूप, साखर घेता येते.)
१४. रात्री देवाच्या सन्निध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते.
१५. वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये.
१६. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
१७. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.
१८. वाचनात यांत्रिकपणा नको. मनोभावे वाचन करावे.
१९. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मधेच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने, याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो, असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच, सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा.
२०. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे, इप्सित फळ आपोआप मिळते, असा गुरुभक्तांचा अनुभव आहे.