दत्त उपासना सोपी नाही. दत्त गुरु ही वैराग्य देवता मानली जाते. भवतापातून आपल्याला सोडवते. त्यामुळे त्यांना शरण जाताना काही नियम पाळणे महत्त्वाचे ठरते. दत्त महाराज या संकेत स्थळावर दत्त बावनी, तिचा अर्थ आणि त्यासंबंधित शंकांचे निरसन केले आहे. आपणही दत्त उपासक असाल आणि हे प्रासादिक स्तोत्र म्हणू इच्छित असाल तर पुढील १५ प्रश्नोत्तर अवश्य वाचा!
प्रश्न १: दत्त बावन्नी कोणी लिहिली ? त्याचे महात्म्य काय आहे?
उत्तर: अ) दत्त संप्रदायातील महान अधिकारी प. प. टेंबे स्वामी महाराजांचे शिष्य प. पू. रंगावधुत महाराज (नारेश्वर) यांनी १९३५ साली सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला दत्त स्तुती पर अद्भुत असे स्तोत्रं लिहिले.ब) दत्तगुरूंनी कृपावंत होऊन पिशाच्च बाधा झालेल्या, आधी-व्याधीने ग्रस्त अश्या लक्ष्मी बेन त्रिपाठी यांच्या साठी पू. बापजीं कडून म्हणजे पू. रंगावधुत स्वामींच्या कडून ही दत्त बावन्नी लिहून घेतली. दत्त संप्रदायात "दत्त बावन्नीला" एटॉम बॉम्ब असे म्हणतात. सर्व मनोकामना परिपूर्ण करणारे हे दिव्य असे स्तोत्र आहे.क) श्रीगुरुचरित्र, श्रीदत्त पुराण, श्रीदत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत ह्या सगळ्या ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावन्नी हे स्तोत्र आहे.
प्रश्न २: ह्या स्तोत्राला दत्त बावन्नी असं कां म्हणतात ?
उत्तर: प. पू. रंगावधूत स्वामींना (पू. बापजींना) तुलसीदास ह्यांच्या हनुमान चालीसा प्रमाणे दत्त चालीसा असे स्तोत्र करायचे होते. लिहिता लिहिता त्या ओव्या ५२ झाल्या. पू. बापजी त्या ओव्या कमी जास्त करण्याचा प्रयत्नांत असताना दत्तप्रभूंनी प्रगट होऊन सुचवले की ह्यातील एकही ओवी कमी करू नये. वर्षाचे आठवडे ५२, गुरुचरित्राचे अध्याय ५२ म्हणून ह्या स्तोत्राची ओळख "दत्त बावन्नी" अशी राहील व दत्त बावन्नी म्हटलं की "रंगावधूत महाराज-नारेश्वर" अशी ओळख होईल!
प्रश्न ३: दर गुरुवारी ५२ वेळा दत्त बावन्नी चे ५२ पाठ करायचे ? की ५२ गुरुवारी न चुकता १ वेळा दत्त बावन्नी म्हणायची ?
उत्तर: दत्त बावन्नी ह्या स्तोत्रात पू. बापजींनी स्तोत्राच्या शेवटी स्वच्छ पणे ह्या बाबत खुलासा केला आहे. "बावन गुरुवारे नित नेम । करे पाठ बावन सप्रेम" असं त्यांनी सांगूनच ठेवलंय ! सलग ५२ गुरुवार म्हणजेच सलग ५२ आठवडे, प्रति गुरुवारी ही ५२ ओव्यांची "दत्त बावन्नी" ५२ वेळा म्हणायची आहे. म्हणजेच ५२ गुरुवारी दत्त बावन्नीचे ५२ पाठ करायचे आहेत. एकदा अनुष्ठान स्वरूप सुरू केलं की त्यात खंड पडू देऊ नये !
प्रश्न ४: दत्त बावन्नी चे ५२ पाठ एकाच बैठकीत करायचे आहेत कां ? की त्याचे काही अन्य नियम आहेत ?
उत्तर: १) "यथावकाशे नित्य नियम" ह्या न्यायाने. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, गुरुवारी आपल्या सोयीने दत्त बावन्नी म्हटली तरी चालेल. १३×४=५२, २६×२=५२, असे आपल्या सोयीने वेळेचे नियोजन बघून म्हणावी !२) दत्त बावन्नीचे कोणतेही सोवळ्या-ओवळ्याचे कडक असे नियम नाहीत...सामान्यतः शुचिर्भूतता राखून शुद्ध अंत:करणानी दत्त बावन्नी प्रेमपूर्वक म्हणावी. आज म्हटली, पुढील ६/७ गुरुवार म्हटली परंतु नंतर ४/५ गुरुवारी म्हटलीच नाही असे अजिबात करू नये. हां नियम प्रेमभराने "नित्य" चालवावा एव्हढेच महत्वाचं पथ्यं आहे !
प्रश्न ५: दत्त बावन्नी कधी म्हणावी ? कुठे म्हणावी ?
उत्तर: अ) दत्त बावन्नीचा एक पाठ सकाळी स्नान झाल्यावर म्हणावा. एकदा म्हणायला फक्त ४/५ मिनिटं लागतात. तसेच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पण घरी आपण म्हणू शकता. ज्या मुळे ज्ञात अज्ञात दुष्ट शक्तींचा नाश होऊन, घरांतील वातावरण मंगलमय होते. घरांत सुख-समाधान नांदते !ब) दत्त बावन्नी आपण कुठेही म्हणू शकता. एखाद्या देवळात, एखाद्या मठांत, किंवा अगदी आपल्या घरी देवघरात बसून पण म्हणू शकता !
प्रश्न ६: दत्त बावन्नी अशौच (सूतक) असताना म्हणली तर चालते कां ?
उत्तर: सोयर (वृद्धी) व सूतक (अशौच) असताना जर गुरूवार आला तर त्या गुरुवारी दत्त बावन्नी म्हणू नये.
प्रश्न ७: स्त्रियांनी ५२ गुरुवारी अनुष्ठान स्वरूप पठण करताना किंवा एरव्ही दत्त बावन्नी म्हणताना काही नियम आहेत कां ?
उत्तर: दत्त बावन्नी हे स्तोत्रं आबाल-वृद्धांनी, स्त्री-पुरुष, कोणीही म्हटलं तरी चालते. त्यास कोणतेही बंधन नाही ! स्त्रियांनी ५२ गुरुवारी ५२ पाठ अनुष्ठान करण्याचा जर संकल्प केला असेल तर मासिक धर्म पालनात जर गुरुवार आला तर तो गुरुवार सोडून पुढील गुरुवार संख्येत धरावा...मासिक धर्मात दत्त बावन्नीचे पठण अजिबात करू नये !
प्रश्न ८: दत्त बावन्नीचे गुरुवारी अनुष्ठान करताना धूप/अगरबत्ती लावावी कां ?
उत्तर: दत्त बावन्नीचे अनुष्ठान करताना सुवासिक धूप किंवा सुवासिक अगरबत्ती असे जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल ते अवश्य लावावे. "करी धूप गाएजे एम । दत्त बावन्नी आसप्रेम" असं पू. बापजींनी दत्त बावन्नी मध्ये म्हणून ठेवलंय. आपण दत्त बावन्नी म्हणताना लावलेल्या अगरबत्तीचा-धूपाचा अभिमंत्रित झालेला "अंगारा" एका डबीत नीट जपून ठेवावा !
प्रश्न ९: संपुटीत दत्त बावन्नी म्हणजे काय ?
उत्तर: प. पू. बापजींनी दत्त बावन्नी लिहिली त्याच बरोबर अनेक दत्त स्तोत्रे लिहिली आहेत. "दत्तनाम-संकीर्तन" हे ८४ श्लोकांचं एक स्तोत्रं लिहिलं. हे स्तोत्रं दत्त बावन्नीच्या ५२ पाठांचे अनुष्ठान करताना आधी म्हणायचं नंतर ५२ पाठ दत्त बावन्नीचे म्हणावयाचे व नंतर पुन्हां हे स्तोत्रं म्हणायचे ह्याला "संपुटीत दत्त बावन्नी" अनुष्ठान असे म्हणतात. संपुटीत दत्त बावन्नी अनुष्ठान हे अत्यंत प्रभावी साधन आहे...
प्रश्न १०: दत्त बावन्नीचे ५२ गुरुवारचे अनुष्ठान परिपूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन करावयाचे असते कां ?
उत्तर: दत्त बावन्नी ह्या स्तोत्राचे जरी ५२ गुरुवारी अनुष्ठान करायचे असले तरी त्याची सांगता झाल्यावर कोणतेही उद्यापन करायचे नाही. त्या बाबत पू. बापजींनी कुठेही लिहिलेलं नाही ! शक्य असल्यास ५२ गुरुवारी ५२ पाठ केलेली सेवा एखाद्या दत्तस्थानी, दत्त मंदिरात, गुरुस्थानी जाऊन समर्पित करावी. अशीच अखंड सेवा करण्याचा संकल्प मनी धरून दत्त बावन्नीची अखंड पणे सेवा करत रहावी !
प्रश्न ११: दर गुरुवारी ५२ पाठ म्हणणे सुरुवातीला शक्य नसल्यास, दत्त बावन्नीची सेवा कशी करावी ?
उत्तर: आपण दत्त बावन्नी हे स्तोत्र नित्य उपासनेत ठेवावं. रोज सकाळ/संध्याकाळी किमान १ तरी पाठ शांत पणे म्हणावा. पुढे दत्त बावन्नी स्तोत्राचे गुजराती शब्द तोंडाला लागले, हळू हळू दत्त बावन्नी पाठ झाली की किमान रोज १३ पाठ म्हणावेत. हळू हळु दत्त कृपेने आपल्याला प्रेरणा झाल्यास "५२ गुरुवारी न चुकता ५२ पाठ" म्हणण्याचा म्हणजेच दत्त बावन्नीचे एक वर्ष भर अनुष्ठान करण्यास सुरुवात करावी !
प्रश्न १२: दत्त बावन्नी गुजराती भाषेत आहे व त्याचे अनुवाद असलेले स्तोत्र पण उपलब्ध आहेत, त्या पैकी कोणती दत्त बावन्नी म्हणावी ? मूळ गुजराती की अनुवादित?
उत्तर: प. पू. रंगावधुत स्वामींनी हे स्तोत्र मूळ गुजराती भाषेत लिहिलं आहे. त्याचे गुजराती उच्चार काही जणांना येत नाही म्हणून मूळ दत्त बावन्नीचा आशय लक्षी घेऊन त्याचा मराठी भाषेत अनुवाद केला गेला. महाराष्ट्रात खूप जणं मराठी अनुवाद म्हणतात. परंतु ज्या रंगावधुत महाराजांनी हे दिव्य स्तोत्र लिहिलं आहे ते गुजराती भाषेत आहे. पू. बापजीनी आपली सर्व शक्ती ह्या स्तोत्रात ओतप्रोत भरलेली आहे. प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी ह्या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवला आहे. म्हणून गुजराती भाषेतील दत्त बावन्नी म्हणणंच हिताचं व श्रेयस्कर ठरेल !
प्रश्न १३: गुजराती भाषेतील मूळ दत्त बावन्नी,देवनागरी लिपीत (मराठीत) म्हटली तर चालेल कां ?
उत्तर: मूळ गुजराती भाषेतील दत्त बावन्नी सध्या मराठी-इंग्रजी व अन्य भाषेत देशाविदेशातील दत्त भक्त म्हणत आहेत. वाचनासाठी भाषा मराठी पण उच्चार गुजराती होणार असतील तर देवनागरी लिपीत लिहिलेली दत्त बावन्नी अवश्य म्हणावी !
प्रश्न १४: दत्त बावन्नी ने वाईट शक्तींचा, भूत प्रेत, पितृदोषांचा परिहार होतो कां ?
उत्तर: दत्त बावन्नीची निर्मितीच पिशाच्च बाधा, आधी-व्याधी दूर करण्यासाठी झाली आहे. ह्यासाठी vivek buwa Gokhale ह्या youtube चॅनेल वरील "दत्त बावन्नी" ची जन्म कथा जरूर ऐकावी !
प्रश्न १५: दुर्धर आजार, मानसिक रोग-शारीरिक रोग, आकस्मित संकटं, दैन्य दुःखाचा परिहार दत्त बावन्नीने होतो कां ?
उत्तर: प. पू. रंगावधुत महाराजांनी दत्त बावन्नी हे स्तोत्र लिहून तुम्हां आम्हां सर्व दत्त भक्तां वर अमोलिक अशी कृपाच केलेली आहे. दत्त बावन्नी ही "लाख दुःखो की एक दवा" असे दिव्य व प्रासादिक स्तोत्रं आहे. दत्त बावन्नी स्तोत्राच्या नित्य पठणाने पठणकर्त्याची सर्व दुःखं दूर होतात, सर्व आधी-व्याधींची निवृत्ती होते. दुर्धर आजारही बरे होतात. दत्त बावन्नी स्तोत्राच्या शेवटच्या ८/१० ओव्या वाचल्या की ह्या स्तोत्राची फलश्रुती आपल्याला लक्षांत येते !
।।श्रीगुरूदेवदत्त।।