गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही चोविस गुरुंचा देवदत्त परुळेकर यांच्या लेखणीतून आजपासून दत्तजयंतीपर्यंत रोज थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल.
अवधुताचा पुढचा गुरु आहे. 'आकाश' भेदामध्ये अभेद कसा पहावा हे आकाशाकडून शिकावे. सर्व भेद पोटात घेऊन पुन्हा त्यापासून अलिप्त कसे राहावे हे आकाश शिकवते. सर्वामध्ये राहून पुन्हा कशात नसण्याची कला योगी आकाशापासून शिकतो. उपनिषदांमध्ये ब्रह्माला आकाशाची उपमा दिलेली आहे. दृष्य विश्वामध्ये परमात्मास्वरूपाच्या जवळ जाणारे आकाशच आहे.
हेही वाचा : दत्त गुरुंचे चोवीस गुरु : तिसरे गुरु : वायू
सर्व पदार्थी समत्व, यालागी आकाशासी गुरुत्व।असंगत्व अभेदत्व, निर्मळत्व जाणोनि।विषमी असोनि समत्व, संगी असोनि असंगत्व।भेदु करिता अभेदत्व, यालागी गुरुत्व आकाश।।
आकाश अगदी निर्मळ, अभेदाने राहणारे, अलिप्त आणि सर्व वस्तूंना सारखे व्यापणारे असते. या गुणासाठी त्याला गुरु करावे. विषयांत असून सम, संगांत राहून नि:संग व भेदात राहून अभेद हा आकाशाचा खरा गुण होय.
साप व मुंगूस यांचे वैर असते. पण दोघांच्याही हृदयात आकाश निवैरपण समभावाने राहते. योग्याची अवस्था अशी हवी. आकाशाप्रमाणे योगी स्वत:ला सर्वव्यापक ब्रह्मभावनेने सगळीकडे व्यापलेले अनुभवतो. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात-किंबहुना नारायणे विश्व कोंदिले,हा केवळ सिद्धांत नसून योग्याचा अनुभव आहे. नाथ म्हणतात-
ब्रह्मसमन्वये पाहता पाही, स्थावरजंगमाच्या ठायी,तिळभरी वाढी रिती नाही, आपण पै पाही कोंदला।
हे अखिल विश्व ब्रह्ममय आहे, या समन्वयदृष्टीने पाहता स्थावर जंगमात आपणच भरून आहोत, आपल्याशिवाय तिळभरही जागा कोठे रिकामी नाही, असे योग्याला दिसते. या आत्मदृष्टीचा परिणाम कसा होतो? भाल्याने आकाशाला टोचता येत नाही. वणव्याने जाळता येत नाही. तसेच,
योगिया छेदावया लवलाहे, सोडिले शस्त्रांचे समुदाये,तो शस्त्रज्ञमाजी आपणियाते पाहे, न रुपती घाये जेवी गगना।
योग्याला तोडावा म्हणून त्याच्यावर अनेक शस्त्रे टाकली तरी त्या शस्त्रांमध्ये तो स्वत:लाच पाहत असल्याने आकाशाला जसे घाव लागत नाहीत, तसे त्याला ते लागत नाहीत. प्रल्हादाला हरप्रकारच्या शस्त्राने मारण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केला पण त्याची सर्व शस्त्रे, सर्व प्रयत्न प्रल्हादाला का मारू शकले नाहीत, प्रल्हाद सर्वत्र तोच परमात्मा पहात होता म्हणून!