कार्तिक वद्य त्रयोदशी. याच दिवशी महाराष्ट्रात आळंदीक्षेत्री भरदुपारी घडलेल्या घटनेने सूर्यदेखील क्षणभर स्तब्ध झाला. इंद्रायणीचे पाणीही थांबले. या घटनेचे जे साक्षीदार होते, त्यांना शोकावेग आवरत नव्हता. सगळे चराचर सुन्न झाले होते. ज्याच्या वियोगाच्या कल्पनेने व्याकुळ होऊन दु:खसागरात लोटले गेले होते, तो २२ वर्षांचा तरुण मुलगा, एक महायोगी. ऐहिकाचा त्याग करून चिरंतनाच्या प्रवासाला निघाला होता. या तरुण महायोग्याच्या हिशोबी हा इहलोक, तो परलोक असे काही नव्हतेच. सगळे जग, सर्व काळ त्याच्या लेखी सारखेच होते. डोळ्यांना जे दिसते किंवा डोळ्यांना जे दिसू शकत नाही, हे त्याच्यासाठी समान होते. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये, अशी सुंदर शब्दरचना करणारा, भगवद्गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरीतून ज्ञानामृत पाजणारा, असामान्य प्रतिभेचे वरदान लाभलेला तत्त्वज्ञ, ज्ञानियांचा राजा अर्थात संत ज्ञानेश्वर, सर्व संतांची ज्ञानोबा माऊली यांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला संजीवन समाधी घेतली. केवळ बावीस वर्षाचे कोवळे वय, परंतु आपले अवतार कार्य संपवून या ज्ञानयोग्याने इहलोकीची यात्रा संपवली. त्यावेळी अखिल चराचराला जे दु:खं झाले, ते दु:खं, कविवर्य बा.भ. बोरकरांनी आपल्या कवितेतून व्यक्त केले आहे.
ज्ञानदेव गेले तेव्हा, तडा विटे गेला,बापरखुमादेविवरु, कटीत वाकला।ज्ञानदेव गेले तेव्हा, बापुडला नामा,लागोपाठ भावंडे, ती गेली निजधामा।माझ्या ज्ञानराजा, ते रे कळो आले आज,भरदुपारी ही तशी झाली तीनसांज।तेव्हाच्यासारखा पुन्हा बावला मोगरा,भुईभर झाल्या कळ्या, तुटला आसरा।इथे आळंदीत आता ऊर फाटे, पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे।कळ्यांचाहि वास जिवा, जाहलासे फास,एकाकी प्रवास आता, उदास उदास।
कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली. त्याला ७२५ वर्षे पूर्ण झाली. तरीदेखील विश्वासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर यांच्या भेटीसाठी आजही आळंदीची यात्रा लोटते आणि पंढरपुरच्या पांडुरंगाच्या पादुका पालखीतून माउलींच्या भेटीसाठी इंद्रायणी काठी आणल्या जातात.
ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, ती वैफल्यातून नव्हे, कारण ते मूर्तिमंत साफल्य हात जोडून उभे होते. त्यांच्या वयाचे तरुण आयुष्याला कंटाळून जीवनाचा त्याग करतात. मात्र, ज्ञानेश्वरांनी जीवनातील प्रतिकुलता संपवून अनुकूलतेची सुरुवात होण्याआधी संजीवन समाधीचा निर्णय घेतला. प्रकाशवैभवाकडे निग्रहाने पाठ फिरवली. आयुष्यात कुठे थांबावे आणि आयुष्य सार्थकी लावून समाधानाने जगाचा निरोप कसा घ्यावा, याचा आदर्श परिपाठ त्यांनी घालून दिला. त्यांनी जनमानसात लावलेला ज्ञानरूपी मोगरा ७२५ वर्षांनी देखील दरवळत आहे, हिच त्यांच्या कार्याची पावती.