एखादी व्यक्ती मृत पावली असता आपण त्यांची आठवण म्हणून त्यांचे कपडे राखून ठेवतो. मग ती आजीची साडी असो, आईची गोधडी असो, वडिलांची शाल असो नाहीतर आजोबांची काठी असो! वस्तूंच्या रूपाने त्या आठवणी दीर्घकाळ जपण्याचा आपला प्रयत्न असतो. मात्र, तसे असले तरी मृत व्यक्तीच्या अंगावरचे कपडे ठेवू नये तर त्यांच्याबरोबर ते कपडेही विसर्जित करावेत असे शास्त्र सांगते. त्यामागे अध्यात्म आहे शिवाय विज्ञानही आहे, काय ते जाणून घेऊ.
मृत्यूनंतर मृतांचे कपडे घालू नका
प्रख्यात धार्मिक गुरु जग्गी वासुदेव म्हणतात की, आत्मा एकदा शरीर सोडून गेला की, कुटुंबातील सदस्यांनी त्या शरीराशी संबंधित कपडे आणि इतर वस्तू दान केल्या पाहिजेत आणि मृत्यूसमयी संसर्ग झालेल्या वस्तू जाळल्या पाहिजेत. याचे कारणही ते सांगतात. जग्गी वासुदेव म्हणतात की शरीर सोडून गेलेला आत्मा देहाबरोबर आपल्या वासनांचाही त्याग करून मुक्त झालेला असतो. मृत्यूसमयी संपर्कात आलेल्या वस्तू जपून ठेवल्यास आत्मा त्या वस्तूंकडे आकृष्ट होतो आणि पुन्हा या नश्वर जगाकडे ओढला जातो आणि तो आत्मा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून राहतो. म्हणून त्या वस्तूंचे दहन करणे इष्ट ठरते. तसेच त्या व्यक्तीचे जुने, नवे वापरण्यायोग्य कपडे धुवून, स्वच्छ करून दान केले असता वस्तूंचा सदुपयोग होतो.
घरात अप्रिय घटना सुरू होतात
ते म्हणतात की मृत्यूनंतर आत्मा ऊर्जा स्वरूपात बदलतो. ती ऊर्जा सकारात्मक आणि नकारात्मक असू शकते. जर ती ऊर्जा नकारात्मक बनली आणि कुटुंबातील सदस्यांनी मृत व्यक्तीचे कपडे घातले तर त्याची सावली त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकते. त्यामुळे कुटुंबात अप्रिय घटनांचा फेरा सुरू होतो.
जग्गी वासुदेव सांगतात की, मृत व्यक्तींच्या कपड्यांव्यतिरिक्त त्यांच्या आवडीच्या वस्तू जसे की पेन, मोबाईल किंवा इतर महागड्या वस्तू देखील फार काळ साठवू नये. त्या वस्तू सतत दिसत राहिल्याने मन उदास होते आणि घरातल्या सदस्यांवर तोच प्रभाव टिकून राहतो. त्यामुळे घरात नकारात्मकता पसरते आणि आत्मा घरात गुंतून राहतो.
घातक जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात
विज्ञान सांगते मृत व्यक्तीचे कपडे किंवा इतर गोष्टी वापरू नयेत. विज्ञानानुसार जेव्हा एखादी व्यक्ती मरते, तेव्हा तिची प्रतिकारशक्ती संपून तो देह अनेक अनेक सूक्ष्म जीवाणू आणि विषाणूंच्या संपर्कात येतो. असे सूक्ष्म जीव जे डोळ्यांना दिसणारही नाही. त्याचा संसर्ग होऊन सामान्य व्यक्तीला त्रास होऊ शकतो. म्हणून व्यक्ती गेल्यावर तिचे पार्थिव फार काळ न ठेवता तिच्या धर्मानुसार दहन किंवा दफन विधी केला जातो. आणि अंत्य यात्रेत सहभागी झालेले निरोप देऊन आल्यावर स्नान करून संसर्गमुक्त होतात. असे असताना आपण अट्टाहासाने जर ते कपडे वापरत असू तर आपण विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने चूक तर करतच आहोत शिवाय मृत आत्म्यालाही गुंतवून ठेवत आहोत हे लक्षात घ्यायला हवे.