यंदा २८ जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे. तिलाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतात. या दिवशी देव घरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून, रांगोळी काढून यथासांग पूजा केली जाते. या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे. परंतु अनेकांना प्रश्न पडतो, की हा दिवा दीप पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी? त्यामागील शास्त्र जाणून घेऊ.
अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केला जातो. प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे, त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे. ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते. अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो. हा दिवा दीप पूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो. दीप अमावास्येनिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते. तसेच किडा मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात. हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे.
हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो, की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानात वाढला जातो. मनुष्याला सण वार एकवेळ लक्षात राहणार नाहीत, परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही. कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात.
सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात, एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक आहे. या दिव्यात साजूक तूप घालून खाल्ले असता त्याची चव आणखी छान लागते. हे दिवे आपल्याला एवढे आवडतात, तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्म जीव जिवाणू का बरे तृप्त होणार नाहीत? यासाठीच दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते.
तुम्ही सुद्धा हे दिवे बनवण्यास उत्सुक असाल तर त्याची कृती पुढीलप्रमाणे आहे -
पाव वाटी गूळ बुडेल एवढे पाणी घेऊन गूळ पूर्ण वितळवून घ्यावा. एक वाटी कणिक अर्थात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ, दोन चमचे तूप कणकेत एकत्र करून गरज लागेल त्याप्रमाणे गुळाचे पाणी टप्प्याटप्प्याने घालून कणिक तिंबून घ्यावी. त्याचे पुऱ्यांसाठी करतो तेवढे गोळे करून त्यांना दिवा, पणतीचा आकार द्यावा. एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यात दिवे ठेवावे. एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगद राहील अशा बेताने चाळणी ठेवावी आणि वर ताट ठेवून पातेले झाकावे. हे दिवे इडली पात्रातही करता येतात. जवळपास २० मिनिटे दिवे शिजू द्यावेत मग गॅस बंद करून दिवे थोडे गार झाल्यावर त्यात साजूक तूप घालून खावेत.