दिनदर्शिके केशरी रंगाने भरलेल्या रकान्यांचे दर्शन घडले, की मनाला उभारी येते. कारण सर्व महिन्यांचा राजा श्रावण याच्या आगमनाचे, व्रत वैकल्याचे, आनंद-उत्सवाचे ते चिन्ह असते. अशा या श्रावण मासाच्या पूर्वसंध्येची सुंदर ओळख आपल्या संस्कृतीने करून दिली आहे, ती म्हणजे 'दीप अमावस्या.' तिलाच आपण दिव्यांची आवस असेही म्हणतो. मात्र काही समाजकंटंकांनी तिला 'गटारी' अशी ओळख देऊन संस्कृतीला बट्टा लावला आहे. यंदा दीप अमावस्या सोमवारी ४ ऑगस्ट रोजी आहे.
श्रावण मासात विविध सण उत्सवांची रेलचेल असल्यामुळे सबंध महिनाभर अनेक जण मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करतात. सणाचे पावित्र्य राखावे, यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनावर घातलेले हे बंधन आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही, की महिनाभर जे खायचं - प्यायचं नाही, ते महिना सुरू व्हायच्या आदल्या दिवशी चापून घ्यायचं! डॉक्टर जेव्हा पथ्य म्हणून दिवसातून एकवेळ जेवा असे सांगतात, त्याचा अर्थ असतो आहारावर नियंत्रण आणा. मात्र आपण आपल्या सोयीने दोन्ही वेळचे जेवण एकाच वेळी ताटात वाढून घेणार असू, तर त्या पथ्याचा उपयोग तरी काय? हाच नियम धर्मसंस्कृतीने मानवी मनावर घालण्यासाठी निदान महिनाभरासाठी शाकाहार करा असे सुचवले आहे.
घरातल्या गृहिणींमुळे तरी शाकाहाराचे व्रत पाळले जाते, परंतु मद्यपींना पिण्यासाठी कोणतेही निमित्त चालते. ते आनंद झाला म्हणून पितात, दु:खं झाले म्हणूनही पितात. अशात एक महिनाभर व्रतस्थ राहायचे, म्हणजे महिन्याभराचा कोटा पूर्ण करण्याचे आयते निमित्त चालून आल्यासारखे आहे. अशा मूठभर लोकांनी आषाढ अमावस्येला 'गटारी' घोषित करून शब्दश: गटारात लोळण्याचा जणू परवानाच मिळवला आहे.
मात्र, हे असे वागणे म्हणजे आपणच हाती राखून आपल्या संस्कृतीचे वाभाडे काढण्यासारखे आहे. आपली संस्कृती आपल्याला आयुष्याच्या उत्कर्षाचे धडे देते. आषाढ अमावस्येला (Aashadh Amavasya 2024) चंद्राची अनुपस्थिती असली म्हणून काय झाले? श्रावण मासाच्या स्वागतासाठी शेकडो दिव्यांचा प्रकाश ती उणीव पूर्ण करेल अशी खात्री देते. हा आपल्या आयुष्यासाठी केवढा मोठा गूढ संदेश आहे, की जेव्हा आपल्याही आयुष्यात काळोखाचे साम्राज्य पसरते, तेव्हा उदास न होता पणतीच्या ज्योतीने का होईना तो दिवस साजरा करावा, तरच आपल्याही आयुष्यात श्रावण नक्कीच येईल.
अशा उदात्त विचारांनी युक्त असलेल्या आपल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घेणे, ही आपली जबाबदारी आहे. म्हणून उद्या कोणी तुम्हाला विचारले की, ' यंदा गटारीला काय विशेष?' तर त्यांना खडसावून सांगा, 'त्या दिवशी दिव्यांची आवस (Deep Amavasya 2024)आहे, गटारी नव्हे!' या दिवशी घरातले दिवे उजळून त्याची पूजा करायची असते तसेच दिव्याचे तेज आपल्या कुलदीपकाला म्हणजेच मुलांना लाभावे म्हणून दिव्याने ओवाळले जाते.
अशा रीतीने आपण आपल्या धर्माची, परंपरांची, नीती मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. आज आपण जे वागणार आहोत, त्याचे अनुकरण उद्याची पिढी करणार आहे. त्यांच्यासमोर योग्य तोच आदर्श ठेवला पाहिजे. शेवटी म्हणतात ना, 'धर्मो रक्षति रक्षित:' अर्थात जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो! चला तर, आपणही धर्मरक्षक बनुया!