आपण नेहमी दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून परनिंदा करतो. पण ज्या व्यक्तीची आपण निंदा करत असतो बहुतांश वेळा तो तिथे उपस्थित देखील नसतो. मग ही निंदा करून कोणता उद्देश पूर्ण सफल झाला. उलट निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करतात. ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने आपल्यापासून भगवंत फार दूरवर आहे समजायला पाहिजे. परनिंदा करण्यासारखे दुसरे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते.
परनिंदेपासून आपण परावृत्त होऊ लागलो की परमेश्वराच्या सन्निध आहोत असे गृहीत धरायला हरकत नाही. म्हणून, ज्याला स्वतःचे जीवन सार्थकी करून घ्यायचे आहे त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि स्वतःला भगवंताच्या नामस्मरणात गुंतून घ्यावे. भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने, दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे. हे ध्यानात ठेवून वागावे आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे. पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोषदेखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे.
मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसर्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही.
विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक 'विठ्ठल विठ्ठल' म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत.
भगवंताकरिता कुणीही कष्ट करून नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे; आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो.