आपल्या कामाची दखल घेतली जावी, आपल्याही वाट्याला प्रशंसा यावी, आपल्यालादेखील पगारात बढती मिळावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. केवळ नोकरीच काय, तर आपल्या घरापासून, समाजापर्यंत सर्वत्र आपली हीच माफक अपेक्षा असते.परंतु, दरवेळी आपल्याला डावलले जात असेल, दुर्लक्ष केले जात असेल, चूकांवर बोट ठेवले जात असेल, तर परिणामी आपल्या कामाची प्रत खालावते आणि नुकसान आपलेच होते. अशा परिस्थितीवर उपाय काय, तो जाणुन घेऊया.
एका कंपनीत एक जुने कर्मचारी निवृत्त होत असतात. त्यांच्या निवृत्तीसमारंभात त्यांना मिळालेला मानसन्मान पाहून एक तरुण अभियंता मोहरून जातो. आपल्या निवृत्तीच्या वेळी आपल्यालाही असा सोहळा अनुभवता येईल का, असे स्वप्न पाहतो. तेव्हा निवृत्त कर्मचारी उपस्थित कर्मचाऱ्यांना अनुभवाचे बोल सांगताना म्हणतात, 'कामात विश्रांतीदेखील महत्त्वाची आहे. तरच कामात आत्मपरीक्षणाला आणि सुधारणेला वाव मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व बाबतीत समतोल राखता आला पाहिजे. तरुण अभियंता त्यांचे शब्द मनावर घेतो आणि कधीही सुटी न घेणारा तो, एक दिवस अचानक सुटी घेतो. सुटीच्या दुसऱ्या दिवशी कामावर येतो, तर त्याचे वरिष्ठ त्याला बोलावून घेतात आणि त्याच्या अनुपस्थितीत कंपनीत किती घोळ झाले हे सांगतात. तो जबाबदारीने सगळ्या गोष्टी निस्तरतो. कंपनीला त्याचा हेवा वाटतो. त्याची किंमत कळते आणि किंमत वाढते. बढती होते. अभियंता आनंदून जातो.
हा पर्याय कामी आला असे समजून वरचेवर सुटी घेऊ लागतो. त्याच्यावाचून काम अडत असल्याचे पाहून कंपनी त्याला नोकरीतून काढून टाकते. अभियंत्याला पश्चात्ताप होतो आणि तो निवृत्त कर्मचाऱ्याची भेट घेतो आणि आपली काय चूक झाली विचारतो.
यावर निवृत्त कर्मचारी मार्मिक उत्तर देतात, `रोज प्रकाश देणाऱ्या दिव्याची किंमत तो एखादवेळेस बंद पडला की कळते. परंतु तो दीवा वारंवार बंद पडत असेल, तर तो काढून नवीन लावणे, हेच लोकांना सोयीचे ठरेल. तू तुझी किंमत , तुझे अस्तित्त्व दाखवून दिलेस. परंतु मी दुसरी गोष्ट सांगितली, ती म्हणजे समतोल राखणे, ती मात्र तू केली नाहीस. म्हणून आपली किंमत आपण ओळखली पाहिजे. इतरांसाठी दरवेळी हाकेसरशी मदतीला न धावता आपली किंमत दाखवून दिली पाहिजे. परंतु, कुठे हो म्हणावे आणि कुठे नाही, याबाबत आपली भूमिका ठाम नसेल, तर आयुष्यात आपली योग्य किंमत कुठेच होणार नाही. ते जेव्हा साध्य होईल, तेव्हा आपल्याला यशाची शीडी आपोआप चढता येईल.
हा कानमंत्र लक्षात घेऊन आपणही आपली किंमत ओळखूया आणि इतरांना आपल्या अस्तित्त्वाचे मोल दाखवून देऊया. अर्थात, योग्य समतोल साधत!