काश्मीर येथील पहलगाम भागात भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप जीव मारले गेले. याबद्दल देशभरातून संतप्त सूर उमटत असताना अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांनीही टिप्पणी केली आहे.
सद्यस्थितीत जाती, धर्म, भाषा यावरून समाजात तेढ निर्माण होत आहे. लोकांच्या मनात द्वेषाने एवढे घर केले आहे की प्रसंगी तो उफाळून येतो आणि पोटातले ओठावर येते आणि बाचाबाची होत गुन्हे घडत आहेत. मात्र शस्त्र घेऊन निष्पाप जीवांना त्यांचा धर्म विचारत त्यांचे प्राण घेणे कोणत्याही धर्मात समर्थनीय नाही, असे प्रेमानंद महाराज म्हणतात.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले, 'जर कोणी दुसऱ्यांना संपवून आपला धर्म मोठा करू पाहत असेल तर तो धर्म नाही अधर्म आहे. कारण तसे करण्याची शिकवण कोणत्याही धर्मात नाही. निष्पाप जीवांचा बळी घेणे, त्रास देणे, छळ करणे हा गुन्हा आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीमुळे कुटुंब, कुटुंबामुळे वसाहत, वसाहतीमुळे समाज, समाजामुळे राज्य, राष्ट्र असुरक्षित होत असेल तर त्या गुन्हेगाराचा बंदोबस्त करणे हा धर्म आहे. विश्वशांतीसाठी अशा लोकांना शासन झालेच पाहिजे. आपली मनमानी करणे हा धर्म नाही तर विकृती आहे. असे वागणारे लोक कोणत्याही धर्माचे असोत, त्यांच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असेल, लोक भयभीत होत असतील, असुरक्षित वाटून घेत असतील तर अशा गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. असाहाय, निर्बल घटकांवर शक्ती प्रयोग करणे हे मती भ्रष्ट झालेल्या लोकांचेच काम आहे. त्यांना शासन करूनच नियंत्रणात आणले पाहिजे.