भागवत संप्रदायात एकादशीला विशेष महत्त्व आहे. त्यातही आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्त्व जास्तच! यंदा १४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. तिलाच आपण देवउठणी एकादशी तसेच प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतो. प्रबोधिनी एकादशीचा आपल्याला माहित असलेला अर्थ आणि त्यामागे दडलेला गूढ अर्थ समजावून घेऊया, अध्यात्मिक गुरु पांडुरंगशास्त्री आठवले, यांच्या चिंतनातून!
कार्तिक शद्ध एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात झोपलेल्या भगवंताला चार महिन्यांच्या दीर्घ झोपेतून उठवण्याचा दिवस. प्रबोधन म्हणजे जागवणे-उठवणे म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असे नाव देण्यात आले आहे. आपल्यातील राम जागृत व्हावा, आपल्याला आपल्या जबाबदारीचे भान यावे, यासाठी लक्षणात्मकरित्या आपल्या ऋषींनी भगवंताला झोपवले. खरे पाहता, भगवंताला जागवणे म्हणजे स्वत:ला जागवणे.
झोपलेल्याला उठवणारी, बसलेल्याला उभा करणारी, उभा असेल त्याला चालायला लावणारी आणि चालत असेल, त्याला धावायला लावणारी ही जीवंत व प्रेरणादायी वैदिक संस्कृती आहे. मानवाचे जीवन कमल पत्रावर असलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. त्याला व्यर्थ प्रमादामध्ये उधळून न टाकता माणसाने जागृत राहून त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. कोंबड्याच्या आरवण्याने किंवा सूर्याच्या उगवण्याने सकाळ होत नाही, तर माणसाच्या उठण्याने सकाळ होते.
ज्ञान हेच सद्गुण आहे. कोणीही माणूस जाणूनबुजून वाईट बनत नाही. गरज आहे ती केवळ सत्य समजावून घेण्याची. आज प्रत्येक माणूस झोपलेला दिसतो. मात्र जागत असल्याचा देखावा करण्यात तो अतिशय कुशल बनलेला आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले, तर माणूस दांभिक बनला आहे. आळस, अज्ञान व अंधार यांच्या घोर निद्रेत असलेल्या मानवाला जागवणारी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी.
या दिवशी भगवंताचे तुळशीशी लग्न लावण्याची परंपरा आहे. भगवान चार महिने झोपल्यानंतर आपण जे काही उलट सुलट केले असेल, त्याचा अतिशय कडक हिशोब त्याने आपणाकडून मागू नये, म्हणून त्याचे ध्यान दुसरीकडे वळवण्यासाठी मानव भगवंताचे लग्न लावून देतो, अशी विनोदी कल्पना कोणाच्या मनात येऊ शकते. भारतीय संस्कृती तुळशीला विभूती समजते आणि `तुलसी माता' या नात्याने तिचे पूजन करते. समाजातून रोग, विकार किंवा पाप दूर करण्यासाठी तुळशीप्रमाणे आपणही जर कटिबद्ध झालो, तर आपणही प्रभूशी लग्न लावू शकू . पण हे सगळे तारुण्यात शक्य आहे. या गोष्टीचे आपल्याला भान यावे, म्हणून तुळशी नारायणाच्या लग्नाचा मंडप उसाच्या झाडांनी बनवण्यात येतो. उसासारखे रसमय जीवन असेल म्हणजे तारुण्यात प्रभुकार्य करता आले, तरच प्रभुच्या मिलनाची शक्यता राहू शकते.
दिवाळीच्या दिवशी अगणित दिवे लावतात, तसे भगवंताच्या विवाहाच्या आनंदात या दिवशीही लोक असंख्य दिवे लावतात. देवासाठी लावलेल्या या दिव्यामुळे प्रबोधिनी एकादशी, `देवदिवाळी' म्हणून प्रसिद्ध आहे.