विविध संतांच्या पालख्या या त्यांच्या वंशजांनी सुरू ठेवल्या परंतु लहान वयातच समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा गुरू हैबतबाबा आरफळकर या भक्ताने सुरू केला. नारायण महाराजानंतर त्यांच्या वंशजामध्ये भाऊबंदकी वाढली आणि १८३१ साली फक्त तुकाराम महाराजांच्याच पादुका पंढरपूरला नेल्या गेल्या. १८३१ माउलींच्या पादुका पंढरपूरला न गेल्याने माउलीभक्त असलेले गुरू हैबतबाबा यांना अतीव दु:ख झाले. सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकाराच्याकडे सरदार होते. पुढील वर्षी कसल्याही परिस्थितीमध्ये माउलींच्या पादुका पंढरपूरला न्यायच्याच असा निश्चय करून त्यांनी वर्षभर जुळवाजुळव केली. शिंदे सरकारांनी त्यासाठी मदत केली. अंकलीचे शितोळे सरकार यांनी घोडे व तंबूची सोय केली. खंडोजीबाबा भापकर आणि सुभानजी शेडगे यांच्यासह हैबतबाबांनी १८३२ साली ज्येष्ठ वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरीची वारी सुरू केली.
पाचशेवर दिंड्या
गुरु हैबतबाबांनी आळंदीकर आणि मल्लप्पा वासकर यांच्यासह पहिली दिंडी निर्माण केली. त्यानंतर दुसरी दिंडी खंडुजीबाबांची तर तिसरी दिंडी सुभानजी शेडगे यांची असा क्रम लावला. कालांतराने पादुका रथामधून नेल्या जाऊ लागल्या. ‘ज्ञानियाचा राजा ’ दिमाखात पंढरपूरला जाऊ लागला. त्यासाठी चौरीवाले, अबदागिरी, भालदार, चोपदार, सनई, चौघडा, शिंगवाले, भोई असे विविध मानकरीसुध्दा तयार झाले. सध्या रथापुढे २७ दिंड्या असतात. तर रथामागे ३०० दिंड्या चालतात. याशिवाय तात्पुरत्या नोंदीच्या मिळून सुमारे ५००च्या वर दिंडयापर्यंत हा सोहळा वाढला आहे. या सोहळ्यात अश्वाची तीन उभी रिंगणे व चार गोल रिंगणे होतात. आजही हैबतबाबांचे वंशज हा सोहळा चालवतात. शितोळे सरकरांचे घोडे, तंबू व नैवेद्य हा मान कायम आहे. १७ दिवसात सुमारे २७५ किमीचे अंतर पार करत पालखी पंढरपूरला पोहोचते.
रिंगणामागची कल्पना
धावणे हा अश्वांचा स्थायीभाव आहे. दररोज चालणाऱ्या अश्वांना कुठेतरी धावण्यासाठी जागा आणि उसंत मिळावी या उद्देशाने त्यांच्यासाठीच या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.
(संकलन : बाळासाहेब बोचरे)