- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र, ८७ ९३ ०३ ०३ ०३ )
महाराष्ट्रातील संतांनी भक्तिमार्गाचा प्रचार आणि प्रसार करतांना देवळातील देव विश्वात्मक बनविला. विश्वात्मक देवाचे वर्णन वेदांमध्ये आहेच पण वेद हे संस्कृत भाषेमध्ये आहेत शिवाय वेदभाषा ही बहुजन समाजाला कळणारी नाही, त्याकाळात वेदमंत्रांचा अधिकारदेखील सर्वांना नव्हता, त्यामुळे वेद तत्वज्ञानापासून बहुजन समाज वंचित राहिला.
संतांनी विचार केला की, मनुष्य देहाच्या उद्धाराचे हे तत्त्वज्ञान समाजाला कळलेच पाहिजे. वेदांच्या कृपणतेबद्दल संतानी खंत व्यक्त केली. ज्ञानराज माऊली म्हणतात -
वेदसंपन्न होय ठाई । परि कृपणू आण नाही ।जो कानी लागला तिही । वर्णाचिया ॥
वेदांतील उद्धाराचा हा मार्ग, हा मानवता धर्म, सर्वांना कळावा, मोक्षद्वार सर्वांसाठी खुले व्हावे, म्हणून संतांनी वेद मराठी मायबोलीत आणले.
वेदांचे काठिण्य लक्षांत घेऊन भगवंताने गीता सांगितली पण अशिक्षित समाजाला गीतादेखील कळाली नाही परत भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेऊन ज्ञानेश्वरीसारखा सुबोध ग्रंथ रचला.
वेदप्रणित मानवता धर्म, तत्वज्ञान बहुजन समाजाच्यासाठी खुले केले. माऊली म्हणतात -
तैसा वाग्विलासे विस्तारू । गीतार्थेसी विश्व भरुं।आनंदाचे आवारु । मांडू जगा ॥
संतांनी कर्मकांडात आणि व्रतवैकल्यांत अडकलेली भक्ती सर्वजनसुलभ केली. देवप्राप्तीसाठी फार सायास करण्याची गरज नाही. पश्चात्तापपूर्वक भगवंताला शरण गेले की, तो सहज प्राप्त होतो. यासाठी संतांनी नामसाधना सांगितली.माऊली हरिपाठात वर्णन करतात -
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।पुण्याची गणना कोण करी ॥
संतांच्या या सोप्या, सुलभ तत्वज्ञानामुळे या देशातील अठरापगड जाती हरिनामाच्या ध्वजाखाली एकत्रित आल्या व त्यांनी पंढरीच्या वाळवंटात एकात्मतेचा गोपाळकाला केला.
पंढरीचा पांडुरंग हा भेदभावातीत आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, पतितपावन आहे त्याला सर्वभावे शरण जा. मन, बुद्धी, चित्त आणि संसारातील सर्व कर्म त्याला अर्पण करा.
जे जे कर्म कराल ते ते निष्काम व निर्लेप करा. कधी कुणाचा द्वेष, मत्सर, वैरभाव करू नका. देव हा देवळापुरता मर्यादित नाही, तो सर्वांतरयामी आहे, सर्वत्र आहे.
जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।हा भक्तीयोग निश्चित । जाण माझा ॥
संतांनी ही भक्ती जनमनांत रुजवली. अशा अभेद वृत्तीने जर जीवन व्यवहार केला तर देवाचे सगुण दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भक्ती म्हणजे नुसतेच बाह्यदर्शन नाही तर अंतरंगात बदल अपेक्षित आहे..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥