वसंत, ग्रीष्म, वर्षा ऋतू ही देवीची रूपे आहेत, तर शरद, हेमंत, शिशिर ही देवांची रूपे मानली जातात. शिशिरात कडाक्याची थंडी पडते. दिवस छोटा होऊ लागतो. सकाळी धुक्याची चादर आणि सायंकाळी मिट्ट अंधार. अशात सूर्याचे कोवळे ऊन फार उबदार वाटते. पानाफुलांवरून दवाचे थेंब ओघळू लागतात. पानगळीचा मौसम सुरू झालेला असला, तरीदेखील धरित्री जणू काही जीर्ण वस्त्र टाकून नवयौवनेप्रमाणे तजेलदार भासू लागते. निसर्गाची ही कूसबदल म्हणजेच धुंधुर मास तथा धनुर्मास (Dhanurmaas 2024) ! यंदा १६ डिसेंबर रोजी धनुर्मास सुरू होत आहे, त्याचे महत्त्व जाणून घेऊ.
शिशिर ऋतूमध्ये सूर्याचे महत्त्व अधिक जाणवू लागते. म्हणून याच काळात सूर्यपूजेशी निगडित अनेक व्रत, पूजा, उत्सव, सण साजरे केले जातात. या उत्सवाच्या निमित्ताने निसर्गपूजेचा विधी पार पाडला जातो आणि निसर्गाशी जवळीक साधली जाते. अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या, रसरशीत फळे बाजारात आलेली असतात. ती पाहून आणि खाऊन तनामनाला उभारी येते.
शिशिर ऋतु येताच हिवाळा अधिक गडद जाणवू लागतो. त्यालाच धुंधुरमास (Dhundhur Maas 2024)असेही म्हणतात. या काळात भूक खूप लागते, परंतु पचनशक्तीचा वेग मंदावत जातो. त्यामुळे आरोग्यवर्धक आहार डोळसपणे घेतला पाहिजे, यावर आहार तज्ज्ञांचा भर असतो. मात्र, याच काळात व्यायामावर भर देण्याकडेही लक्ष दिले जाते. नवीन वर्ष, गारवा, थंडी, धुके हे सर्व निमित्त साधून प्रभात फेरीची सुरुवात होते. हा काळ आरोग्याच्या कमाईसाठी अनुकूल ठरतो. उत्तरायणाची सुरुवात झालेली असत़े वर्षभरासाठी सूर्य नमस्काराचा संकल्प देखील केला जातो.
याच काळात अनेक धन धान्य शेतातून घरी आलेली असतात. हे सर्व काही देवाच्या कृपेने प्राप्त झाले, या श्रद्धेने बळीराजा ते देवाला अर्पण करतो. त्यानिमित्ताने अनेक सोहळे साजरे केले जातात. असा हा धुंधुर मास शिशिर ऋतूच्या आगमनाबरोबर अर्थात १६ डिसेंबर पासून सुरू होईल.
या सर्व गोष्टींबरोबर इंग्रजी वर्षाची सांगता काही दिवसांवर येऊन ठेपलेली असल्यामुळेही, २०२४ ला निरोप देण्यासाठी लोक अगतिक झाले आहेत. त्याचवेळेस २०२५ च्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. तूर्तास आपण हेमंत सरून सुरू होणाऱ्या शिशिराचे सोहळे अनुभवूया आणि प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करूया.