Gajanan Maharaj And Shankar Maharaj: स्वामी आणि त्यांचे शिष्य यांबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. स्वामी हे प्रत्यक्ष दत्तगुरुंचे अवतार आणि स्वामींचे शिष्य हे दैवी असेच आहेत. स्वामींचे मार्गदर्शन आणि आदेश हे शिष्यांनी कायम पाळले आणि तसेच अवतारकार्य पुढे सुरू ठेवले, असे म्हटले जाते. गजानन महाराज आणि शंकर महाराज हे दोन्ही अवतारी पुरुष मानले गेले असून, स्वामींच्या दैवी शिष्यांपैकी एक मानले जातात. या दोघांना स्वामींचा सहवास, स्वामींचे मार्गदर्शन लाभले. स्वामींनी दिलेल्या आदेशानुसारच या दोघांनी कार्य केले. गजानन महाराज आणि शंकर महाराज यांनी गुरुभक्तीच्या सुपंथाचा आदर्श वस्तुपाठ तर घालून दिलाच, पण त्यांच्या भक्तांचाही उद्धार केला.
अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितले की, तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटले की ही भुताटकी आहे काय? पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे, असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगांवमध्ये व्यतीत केला. अवतारकार्यात महाराजांची हजारो भाविकांचा उद्धार केल्याचे सांगितले जाते.
मी गेलो ऐसे मानू नका। भक्तित अंतर करू नका। कदा मजलागी विसरु नका। मी आहे येथेच।।
दु:ख न करावे यत्किंचित। आम्ही आहोत येथेच। तुम्हा सांभाळण्यापरी सत्य। तुमचा विसर पडणे नसे।।
गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।। या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवीत राहायाते ।।
हे स्तोत्र नसे अमृत ते । मंत्राची योग्यता याते ।। हे संजीवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते ।।
शंकर महाराज हे स्वामींना ‘मालक’ असे संबोधत
शंकर महाराज हे स्वामींना ‘मालक’ असे संबोधत असत, असेही सांगितले जाते. लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोहोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. ते हरणाचे पिल्लू त्या देवळात आश्रयाला लपले. त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाले की, कशाला मारतोस रे याला, काय बिघडवले याने तुझे. काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्यांची प्रथम स्पर्शशिक्षा. शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले. तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज, असे म्हणतात. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत. तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत रहात. संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरू आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर महाराज सांगत माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे.
कैक करिती मनी हा विचारशंकर महाराज काय हा प्रकारस्वानुभव घ्या खुला दरबारदूर राहून ते नाही कळणार ।।धृ.।।
भक्ती केली भक्तांनी जैसीकृपा करतात बाबाही तैसीगुरुभक्ती ती व्यर्थ न जाणारदूर राहून ते नाही कळणार ।।१।।
करिता बाबा मदिरा धुम्रपानशोधिले याचे लोकांनी कारणज्यांनी केले विषाचे प्राशनत्यांना मदिरा ती काय बाधणार ।।२।।
ज्याला दिली बाबांनी दिव्य दृष्टीत्याला दिसतात ते समाधीवरतीगुरुभक्तीवीन नाही कळणारअनुभव ज्याला त्यालाच मिळणार ।।३।।
भक्तांना नित्य अनुभव येतातबाबा नाना रुपात भेटतातश्रद्धा भक्तिविना नाही कळणारदूर राहून ते नाही कळणार ।।४।।
मागावे काय आम्ही सदगुरूंनासर्व ठावे ते माझ्या शंकरालागुरुभक्तांचा गुरुचरणी भारबाबा घेतील त्यांचा कैवार ।।५।।
।। गण गण गणात बोते ।।
।। जय शंकर ।।
।। श्री स्वामी समर्थ ।।