यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
भगवान श्रीकृष्णांच्या या वचनांचे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी निरुपण खूप सुंदर केले आहे.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे भारत अर्जुना, जेव्हां जेव्हां धर्माचा र्हास होतो व अधर्मात वाढ होते, तेव्हां तेव्हां मी प्रगट होतो. साधुंचे रक्षण करण्या व दुष्टांचा विनाश करुन धर्माची पुनर्स्थापना करण्या युगेयुगे मी अवतरित होतो. जेव्हां अधर्म वाढू लागतो तेव्हांच धर्माचा र्हास होतो. अधर्माचा र्हास करताे कोण ? अध्यात्मात असे म्हटले जाते की, माणसात व समस्त पशुंत भेद कोणता आहे ? आहार, निद्रा, भीती व शरीर संबंध हे तर दोघांतही समान आहेत. पशुंचे जीवन स्वाभाविक व प्रकृति अधीन राहिले. पण शरीर मन बुध्दी पायी माणसात स्वाभाविक व प्राकृतिक जीवनात अंतर पडत गेले. तेव्हां परमात्म्याव्दारेच अवतार घेऊन धर्माचा बोध माणसाला मिळत गेला. त्यामुळे पशुत धर्म नाही, धर्म माणसाकरिता आहे. केवळ भारतातच नव्हे तर समस्त जगात धर्म बोध देणारे महात्मे अवतरीत झाले. त्यांनी धर्माची तत्वे शिकविली. मग धर्माअधीनच्या मोजेसच्या टेन कमान्डमेन्ट असो की येशु ख्रिस्तांची प्रेमाची तत्वे असोत. त्यांनी सुचविलेल्या धर्मतत्वांचे आधारे मानवी जीवन संपन्न, सुख व शांतीने जरुर व्यतित होत राहिले. परंतु समस्त पृथ्वी करिता सुख शांती देणारी ही धर्म तत्वे धीरे धीरे मागे पडून, त्याविरुध्दची अधर्म तत्वे प्रबळ होतात. धर्म लुप्तप्राय होतो. मानवी जीवन अधोगतीस जावून, पृथ्वी विनाश होण्याचे मार्गावर लागते. त्यावेळी परमात्मा मनुष्यदेहाने प्रगट होतो, अवतरित होतो. धर्माचे र्हास काळात धर्म रक्षिणारे साधु उपेक्षीत होतात, त्यांच्या हत्या होतात, साधु असुरक्षित होतात. कारण अधर्म त्यांना पाहूनच जादा खजील होतो, अधर्माचे मनात असुया जागते, तो खरा असून खोटा ठरविल्या जाऊ शकताे. हे सर्व घडते धर्माचे मागे पडण्यामुळे. धर्माविषयीच्या अज्ञानाने दुष्टता निर्माण होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी लुप्तप्राय झालेल्या धर्माची स्थापना करतो. यामुळेच साधुंचे रक्षण होते व अधर्माने जगणार्या दुष्टांचे मनातील दुष्टताही मी दूर करतो. भगवान श्रीकृष्णांचे या वचनांचे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी निरुपण खूप सुंदर केले आहे.
जेवढे धर्म म्हणून काही आहेत, त्यांचे मी युगा युगात रक्षण करावे असा हा आदिकाळापासूनचा स्वाभाविक प्रवाह आहे. ज्यावेळी अधर्म हा धर्मावर अभिभवी अर्थात त्यावर मात करतो, त्यावेळी मी जन्म न घेणे बाजुला ठेवतो व अव्यक्त, निराकारपणची आठवणही करत नाही. मला आपले समजणार्या भक्तांचे कैवारासाठी मी देह आकाराने अवतरुन, अज्ञानाचे अंधाराला नष्ट करतो. धर्माचा अवधी बांधतो, अर्थात सीमेत बांधल्या गेलेल्या धर्माला मुक्त करतो. धर्माविषयी दोषपूर्ण जे काही लिहिल्या गेले आहे ते मी फाडून संपवितो. सत्पुरुषांकरवी आत्मिकसुखाची गुढी उभारतो. अधर्मी दैत्यांचे कुळाचा नाश करुन, साधुंचा मान स्थापित करतो. धर्माची नीतीशी सेंस भरतो अर्थात गांठ बांधतो. सेंस भरी हा माऊलींचा त्याकाळचा शब्द आहे. डांगे सरांनी त्याचा अर्थ नवरानवरीला मांगल्याचा मळवट भरवणे असा सुंदर अर्थ शोधून नमूद केला आहे. त्यामुळे धर्म व नीती या जोडप्याला मांगल्याचा मळवट भरतो असा सुंदर अर्थ माऊलींनी प्रगट केला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी अविवेकाची, अज्ञानाची काजळी दूर करुन, विवेकाचा दीप उजळवितो. ज्यामुळे, योगियांना ज्ञान प्रकाश लाभल्याने त्यांना नित्य आनंदाची दिवाळी लाभते. त्यांवेळी केवळ धर्म वर्तत राहिल्याने स्वानंदाने अवघे विश्व भरुन जाते. सात्विक भावाने भक्तांना सुखाची तृप्ती लाभते. हे अर्जुना, जेव्हा मी अशा रितीने अवतार रुपाने प्रगट होतो. त्यावेळी पापांचा पर्वत नष्ट होतो. पुण्याची पहाट उजळते. असे कार्य करण्यासाठी मी युगा युगात अवतार घेतो. परंतु हे अवतार कार्य जो जाणतो, तोच विवेकी जाण.
- शं.ना.बेंडे अकोला.