मृत्यूचे भय प्रत्येकाला वाटत असते. त्यातही अकाली मृत्यूचे भय जास्तच असते. मृत्यू कधी, कसा येईल हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु, तो कसा येऊ नये, यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो. त्यासाठीच शास्त्रात धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला दीपदान केले जाते.
कसे करावे दीपदान: मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून, तो दिवा प्रज्वलित केला जातो. अनन्यभावे तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते.
यमदीपदान धनत्रयोदशीलाच का केले जाते, या संदर्भात पौराणिक कथा: हंसराज नावाचा एक राजा होता. तो एकदा आपल्या सैनिकांसह शिकारीसाठी गेला होता. शिकारीच्या शोधात राजाची आणि सैन्याची ताटातूट झाली. राजा भरकटत दुसऱ्या राज्यात पोहोचला. तिथला राजा हेमराज याच्यासमोर हंसराज राजाने आपली ओळख दिली. हेमराजनेही हंसरंजाचे आदरातिथ्य केले. त्याचवेळेस हेमराजाला पुत्रप्राप्ती झाली आणि त्या आनंदात त्याने हंसराजाला आणखी काही दिवस राहण्याची विनंती केली.
तेजस्वी बाळाचे भाकीत वर्तवण्यासाठी राजज्योतिष आले. सर्व जण उत्सुकतेने भविष्य ऐकत होते. मात्र एका क्षणी ज्योतिष थांबले आणि राजाला म्हणाले, राजन, तुझा पुत्र अतिशय पराक्रमी होईल. मात्र युवावस्थेत त्याच्या विवाहाच्या अवघ्या चार दिवसांनी त्याचा मृत्यू होईल.
हे भाकीत ऐकून हेमराज अस्वस्थ झाला. हंसराजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर बाळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याला अकाली मृत्यू येऊ देणार नाही, असा शब्द दिला. त्यानुसार हंसराज, बाळाला घेऊन आपल्या राज्यात गेला. त्याचे राजकुमारासारखे पालनपोषण केले. ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार राजकुमार शूर, पराक्रमी आणि महातेजस्वी बनला. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. आपणहून त्याला विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले. एका सुंदर राजकुमारीशी त्याचा विवाह देखील झाला. सर्वजण आनंदात असताना हंसराजाला राजज्योतिषांनी केलेली भविष्यवाणी आठवली. त्याने कडेकोट बंदोबस्त केला.
विवाहाच्या चौथ्या दिवशी दैव गतीनुसार यमदूत राजकुमाराला यमसदनाला नेण्यासाठी आले. परंतु हा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पाहून तेदेखील हरखून गेले. त्या राजकुमाराला अभय द्यावे, असा विचार त्यांच्या मनात आला. यमराजांना ही बाब कळणार नाही, याची त्यांनी खबरदारी घेतली. परंतु, यमराजांना ही बातमी कळली. त्यांनी यमदूतांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून असे काही घडले असल्यास कबुली जवाब मागितला. त्यांना शिक्षा देणार नाही, या बोलीवर बोलते केले आणि सत्य वदवून घेतले. यमदूतांच्या सांगण्यानुसार खुद्द यमदेवांनी देखील राजकुमार आणि राजकुमारीचा नवा संसार पाहिला आणि त्यांचेही हृदय द्रवले.
यमराज म्हणाले, 'आपण सगळेच जण कर्तव्याने बांधील आहोत. मृत्यू अटळ आहे, तो कोणीच टाळू शकत नाही. परंतु, जे कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा झाल्यावर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मलाही दीपदान करतील, त्यांना अकाली मृत्यू येणार नाही.
कथेतील सत्यासत्यता पडताळत राहण्यापेक्षा श्रद्धेने एक दिवा यमराजांना समर्पित केला, तर आपल्याला अकाली मृत्यू येणार नाही, हा दिलासा नक्कीच मिळू शकेल.
हेही वाचा : Diwali 2020: वसुबारस ते भाऊबीज, जाणून घ्या दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष