यंदा १४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. दरवर्षी कार्तिक कृष्ण अमावस्येला लक्ष्मीपूजा केली जाते. महालक्ष्मीबरोबरच तिचा सुपुत्र गणेश याचीही पूजा केली जाते. कारण, लक्ष्मी प्रसन्न झाली, तरी योग्य ठिकाणी तिचा विनीमय कसा करावा, यासाठी सद्बुद्धीची गरज असते. ती देणारी देवता, म्हणजे गणपती बाप्पा. म्हणून या माय-लेकाला लक्ष्मीपूजेच्या दिवशी आवाहन करतात आणि पूजा समर्पित करतात.
लक्ष्मीपूजेचे महत्त्व-समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा लक्ष्मीपूजेच्या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी आणि आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या, गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तो प्रसाद सर्वांना वाटतात़ लक्ष्मीपूजेला चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा केली जाते. व्यापारी वर्ग यादिवशी आपल्या व्यवहाराचे दस्तावेज, वह्या, हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून `चोपडा पूजन' करतात. तसेच फटाके उडवून आनंद साजरा करतात.
Diwali 2020 : नरकचतुर्दशी, बलीप्रतिपदा अशा दिवाळीत येणाऱ्या सणांचे नेमके महत्त्व काय आहे?
लक्ष्मीपूजेचा मुहूर्त-लक्ष्मीपूजेच्या दिवशी पूजेचा मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ३० मीनिटांपासून सुरू होऊन सायंकाळी ७ वाजून ३५ मीनिटांपर्यंत आहे. तसेच प्रदोष काल मुहूर्त ५ वाजून २७ मीनिटांपासून ८ वाजून ६ मीनिटांपर्यंत आहे. दर्श अमावस्या आणि शनि अमावस्या हा योग देखील त्या दिवशी जुळून आलेला आहे. त्यामुळे शनि महाराजांची तसेच मारुतीची उपासनाही फलदायी ठरू शकेल.
लक्ष्मीपूजेचा विधी-सर्वप्रथम एक चौरंग मांडून पूजेचा परिसर शुचिर्भूत करून घ्यावा. त्यावर स्वच्छ व शुभ्र वस्त्र मांडावे आणि महालक्ष्मी तसेच महागणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. गणपतीची यथासांग पूजा करून लक्ष्मीपूजेची सुरुवात करावी.
ओम अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्था गतोपि वा,य: स्मरेत पुंडरिकाक्षं स: वाह्याभंतर: शुचि:।।
हा मंत्र म्हणत मूर्तीवर पाण्याने आणि पंचामृतो अभिषेक करून घ्यावा. गंधाक्षता, फुले वाहून देवी आणि गणपतीला आवाहन करावे. त्याचवेळेस पृथ्वीमातेसही मनापासून अभिवादन करत ऋण व्यक्त करावेत.
समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले,विष्णूपत्नी नम: स्तुभ्यम् पाद: स्पर्शम् क्षमस्वमे।
हा श्लोक म्हणत जमिनीला हात लावून नमस्कार करावा. भूमीपूजन आणि स्मरण याकरीता, कारण ही काळी आई आपल्याला धनधान्य देते आणि पालनपोषण करते. म्हणून तिला नमस्कार.
ओम पृथ्वी त्वया धृता, लोका देवि त्वं विष्णुना धृता,त्वं च धारय मां देवी पवित्रम् कुरु चासनम्
हा श्लोक म्हणत, 'पृथिव्यै नम:', 'आधरशक्तये नम:' असे म्हणत ताम्हनात पाणी सोडावे.
त्यानंतर ओम केशवाय नम:, ओम नारायणाय नम:, ओम माधवाय नम: मंत्र म्हणत गंगोदक प्राशन करावे. पळीभर पाणी हातात घेऊन संकल्प सोडावा आणि हातात फुले , अक्षता आणि एक रुपया घेऊन त्यावर पळीभर पाणी सोडत देवाला अर्पण करावा. नवग्रहांची पूजा करून, नवग्रह स्तोत्र म्हणावे किंवा ऐकावे. पूजेतील सर्व देवांना गंध व फुल वाहून नमस्कार करावा. त्यानंतर लक्ष्मीपूजा करताना धन,संपत्ती लक्ष्मीचरणी अर्पण करून श्रीसुक्त, लक्ष्मीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्रपठण किंवा श्रवण करावे.
दिव्यांचे पूजन करावे. महालक्ष्मी आणि गणपतीसमोर दिव्यांची आरास करावी. धूप-दीप लावावे. सुबक रांगोळी काढावी. फुलांची आरास करावी. मंगल संगीत लावावे. सर्व पूजा समाप्त झाल्यावर आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांची क्षमा मागावी. गणपतीची, देवीची आरती करावी.