आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरा ही फार उज्ज्वल आणि पुरातन आहे, याबद्दल जानकारांत कुठेही वाद नाही. गंमत अशी, की काही हजार वर्षांपूर्वी आपला देश काही अडीअडचणीच्या भोवऱ्यात सापडला होता. या देशात पाळले जाणारे यमनियम आणि धार्मिक शिष्टाचार यामध्ये नको तेवढा कर्मठपणा आला होता. अशा स्थितीत जुन्या आचारविचारातील उणिवा दूर करण्याच्या हेतूने काही धर्म, काही पंथ आणि काही उपपंथ सुरू झाले. त्यांनी इथल्या जुन्या सांस्कृतिक धर्माला नावे ठेवण्यास सुरुवात केली. नसलेले दाखवले, परंतु वस्तुस्थिती झाकून ठेवली. ती काय होती?
आपला देश हा जीवनाकडे उदात्त आणि उदार दृष्टीकोनातून पाहणाऱ्या लोकांचा देश आहे. वस्तुस्थितीकडे पाठ न फिरवता सत्यासाठी, न्यायासाठी लढणाऱ्यांचा देश आहे. ज्याला आपले मानले त्याला कितीही प्रतिकूल परिस्थितीत दूर न लोटणाऱ्यांचा हा देश आहे. चांगल्या मार्गाने आणि वैध पद्धतीने धनसंपत्ती मिळवून दुसऱ्यांना उपद्रव न देता सुखस्वास्थ्य मिळवणाऱ्यांचा देश आहे. धनसंपत्ती मिळवताना ती संपत्ती हा परमेश्वरी कृपाप्रसाद आहे, अशी नम्र भावना बाळगणाऱ्यांचा देश आहे.
हेही वाचा : Diwali 2020 : माय-लेकाच्या नात्याचे वसुबारसेच्या निमित्ताने प्रतीकात्मक पूजन
हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टींचा सखोल अभ्यास, विचार आणि त्यानुसार पूजा, उत्सव यांचे स्वरूप ठरवले गेले आहे. श्रावणात व्रताचरण, भाद्रपदात बाप्पाचे आगमन, पितृपंधरवड्यात पितरांचे स्मरण, अश्विन महिन्यात दुर्गेचे आणि कार्तिक महिन्यात लक्ष्मीचे पूजन केले जाते.
लक्ष्मीपूजनाच्या आधी येते धनत्रयोदशी. या दिवशी धनाची पूजा केली जाते. सोन्यानाण्यांवर गंधाक्षता फूल वाहिले जाते. यावर्षी धनत्रयोदशी शुक्रवारी आली आहे. शुक्रवार हा देवीचा वार. लक्ष्मीचा वार. शुक्रवारच्या कहाणीत `जोवरी पैसा तोवर बैसा' असे सांगून धन-संपत्तीचे महत्त्व अधोरेखित केल आहे.
चांगल्या मार्गाने, चांगल्या हेतूने कमावलेली संपत्ती आपल्या घरात टिकून राहावी, वृद्धिंगत व्हावी, यादृष्टीने धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. अनेक जण सुटीअभावी किंवा कौटुंबिक प्रथेप्रमाणे लक्ष्मीपूनाच्या दिवशी संपत्ती पूजन करतात. दिवस बदलला, तरी धनलक्ष्मीची पूजा करणे हाच मुख्या उद्देश असतो.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनीदेखील म्हटले आहे, `रिकामे बसू नका, काम करत राहा आणि चांगल्या कामातून घरदारासाठी चांगला पैसा जोडा.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी।।उत्तमची गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी।।पर उपकारी नेणें परनींदा । परस्त्रीया सदा बहिणी माया।।भूतदया गाई पशूंचे पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी।।शांतिरुपे नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचे।।तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ । परंपद बळ वैराग्याचे।।
याउलट वाममार्गाने घरात आलेला पैसा गृहकलहास कारणीभूत ठरतो. मन:शांती, गृहशांती नष्ट होते. म्हणून जेवढे आवश्यक आहे, तेवढेच धन जोडा. अतिरिक्त मोह ठेवू नका, सर्वांशी उत्तम व्यवहार ठेवा. हेच धनत्रयोदशीचे महत्त्व आहे.
हेही वाचा : Diwali 2020 : माय-लेकाच्या नात्याचे वसुबारसेच्या निमित्ताने प्रतीकात्मक पूजन