४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. त्यानिमित्ताने घरोघरी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाईल. घरातल्या लक्ष्मीची पूजा केली जाईल. घराबाहेरील लक्ष्मी मातेला आवाहन केले जाईल आणि ती कायमस्वरूपी आपल्याकडे राहावी, नोकरी धंद्यात बरकत व्हावी, आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून प्रार्थना केली जाईल. मात्र या भक्तिभावाबरोबर वास्तूशास्त्राने एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणजे उंबरठा! अलीकडच्या काळात आपण पाहिले असेल, की आधुनिक घरांना उंबरठा नसतो. परंतु, उंबरठा ही केवळ एक सीमारेषा नाही, तर दाराची चौकट पूर्ण करणारी बाब आहे. म्हणून पूर्वापार हिंदू संस्कृतीनुसार घरांना उंबरठा असे. वास्तुशास्त्रात त्याला अतिशय महत्त्व आहे.
>> घरात श्रीलक्ष्मी नांदावी, ती बाहेर जाऊन नये, तिला घरात थांबवून ठेवता यावे, म्हणून उंबरठा बांधला जातो. तिन्ही सांजेला लक्ष्मी घरी येते. तिचे उंबरठ्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते.
>> उंबरठ्याला महत्त्व एवढे, की पूर्वी घराघरातून रोज सकाळी त्याची पूजा होत असे. अंगणाबरोबर उंबरठ्याशी रांगोळीची दोन बोटं काढली जात असे. तिन्ही सांजेला उंबरठ्यापाशी दिवा लावला जात असे.
>> नव्या नवरीच्या पायगुणाने घरात धन धान्य समृद्धी घेऊन यावी, म्हणून आजही गृहप्रवेश करताना तिला उंबरठ्यावर माप ओलांडून आत घेतले जाते.
>> अतिथी असो किंवा अन्य कोणीही व्यक्ती घरात थेट प्रवेश करू नये, म्हणून त्याला उंबरठा ही सीमारेषा आखून दिलेली असते. घरातल्या व्यक्तीची अनुमती असेल, तरच ती व्यक्ती घराचा उंबरठा ओलांडून आत येऊ शकते.
>> त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना वेळेचे, संस्काराचे, कुळाचे कायम स्मरण राहवे, त्यांच्याकडून चुकीचे पाऊल उचलले जाऊ नये, म्हणून पूर्वी 'सातच्या आत घरात' ही शिस्त लावलेली असे. सात नंतर घरातील कोणीही सदस्य कामाशिवाय घराचा उंबरठा ओलांडत नसे. आज काळ बदलला आहे. आताच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सात च्या आत घरात हा नियम लागू करणे शक्य नाही, तरीदेखील घराचा उंबरठा आजही घराची शिस्त, संस्कार यांची आठवण करून देतो.
>> बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल, तरी ती घरात प्रवेश करू शकत नाही. कारण घराचा उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो, अशी पूर्वापार श्रद्धा आणि लोकांना आलेला अनुभव आहे.
>> उंबरठ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली, तर वास्तूत सुख, समृद्धी नांदते, असे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात.
म्हणून घराच्या आतील खोल्यांना उंबरठा नसला तरी चालेल, परंतु प्रवेश द्वाराला उंबरठा अवश्य बनवून घ्या.