दीप हा षोडशोपचार पूजेतला एक उपचार आहे. हा उपचार विविध रूपांनी केला जातो. विष्णू किंवा विठ्ठलाच्या मंदिरात रोज रात्री नेमाने शेजारती आणि प्रभातकाली काकडारती करण्याची पद्धत आहे. काशी, प्रयाग, गया इ. क्षेत्री यात्रेकरू संध्याकाळी गंगेच्या घाटावर जाऊन एका द्रोणात फुले आणि फुलवात ठेवून ती वात प्रज्वलित करून तो द्रोण नदीच्या पात्रात सोडतात. हे गंगामाईला उपचार समर्पण असते. दिवाळीत त्याचे विशेष महत्त्व आहे. कसे ते समजून घेऊ.
दीपदान हे पुण्यप्रद कर्म आहे. कार्तिक मासात भगवान विष्णूंच्या समोर दिवा लावल्यास तुलादानाची, सर्व तीर्थात अवगाहन केल्याची, पुण्यकर्माची फलप्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो. नरकचतुर्दशीला दीपदान केल्यास नरकवास भोगावा लागत नाही अशी धारणा आहे.
दीप हा अग्नीचे व तेजाचे रूप असून वैदिक काळात हा अग्नी यज्ञकुंडाच्या माध्यमानेच आपले अस्तित्व टिकुन राहात असे. तर दीपाच्या रूपाने तो मानवाला प्रकाश देऊ लागला. दीपज्योत हे ज्ञानाचे आणि बुद्धीचे प्रतीक मानलेले आहे. `तमसो मा ज्योतिर्गमय!' म्हणजे अंधारातून मला तेजाकडे ने अशी उपनिषदात प्रार्थना आहे.
प्रकाशाचे साधन या दृष्टीने दिव्याला असाधारण महत्त्व आहे. म्हणूनच धार्मिक कुळाचारातही दिव्याचे माहात्म्य प्रस्थापित झाले आहे. आपल्या मोठमोठ्या देवळातून 'दीपमाळ' नावाचा एक सुंदर जाडजूड खांब व त्यावर दिवे ठेवायला जागा असे दगडी बांधकाम हमखास असतेच.
कोणत्याही उत्तम कार्याचा प्रारंभ आजकाल अगदी अगत्याने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून होतो. तो या कार्याचा दीप. म्हणजे विचार प्रकाश हळूहळू विकसित होऊन सर्वांपर्यंत पोहोचावा व या कार्यास त्यांचाही हातभार व सहकार्य लाभावे याच हेतूने केला जातो.
सासूरवाशिणीने आपल्या माहेरी दीपदान व दीपपूजन करावयाची प्रथा आहे. माहेरून आपल्याला सतत मायेचा, प्रेमाचा प्रकाश मिळत राहावा, माहेरी सुख नांदावे ही भावना या प्रथेमागे होती. त्या दीपाच्या तेलवातीचा खर्च ही माहेरवाशीण देत असे. तुपाचा दीप हा प्रदूषणनाशक समजला जातो.
असे हे दिव्याचे महत्त्व जाणून घेत आपणही अंधारात आशेचा दीप प्रज्वलित करूया आणि मांगल्य, तेज आणि संस्कृतीचे पूजन करूया.