जन्म मृत्यू आपल्या हाती नाही, पण दोन्ही वाट्याला येणार हे निश्चित! येताना आणि जाताना देहाला घडणारा प्रवास सुलभ व्हावा म्हणून आपण प्रार्थना करतो. बाळ जन्माला आलं की पहिली बातमी येते- बाळ बाळंतीण सुखरूप! यात 'सुखरूप' शब्दाला फार महत्त्व आहे. सुखाने प्रवास करताना रुपाला धक्का न लागता अर्थात थोडंही न खरचटता झालेला प्रवास तो सुखरूप प्रवास! येताना जेवढी काळजी तेवढीच जातानाही काळजी महत्त्वाची. देह संपेल, पण आत्म्याला सद्गती लाभावी म्हणूनही धर्मशास्त्राने दूरदृष्टीने विचार करून ठेवलाय.
दीपावलीच्या आनंदाच्या क्षणी यमराजाची आठवण ठेवून त्यालाही एक दिवा धनत्रयोदशीच्या सायंकाळी अर्पण करायचा नियम आखून दिलाय. दिवाही कसला? तर कणकेचा. त्यात हळद, तेल घालून वात लावावी आणि दिवा प्रज्वलित करावा. दक्षिण ही यमराजाची दिशा मानतो, त्यामुळे दिव्याचे तोंड त्या दिशेने वळवून यमदीपदान करायचे. अकाली मृत्यूचे भय टळू दे अशी प्रार्थना करायची. अर्थात ही प्रार्थना केवळ एक दिवस नाही, तर दररोज करायची. कारण, मृत्यू काही पूर्वकल्पना देऊन येत नाही. पण तो येताना आपल्या इच्छा आकांक्षा अतृप्त नसाव्या, भेटी गाठी बाकी नसाव्या, शरीर दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन मरण येण्यापेक्षा तेही सहज सुलभ यावं म्हणून एक श्लोक आहे, तो रोज म्हणावा असे शास्त्र सांगते.
काही गोष्टी श्रद्धेने केल्या की त्या फळतात. यात अंधश्रद्धा नाही, हा केवळ आर्जव आहे, विनंती आहे, आग्रह आहे देवाकडे, की शेवट गोड होऊ दे. शेवटी तुझे सानिध्य मिळू दे आणि हा जीव शिवाशी एकरूप होउदे! म्हणून आज यमदीपदान करावे आणि पुढील श्लोक रोजच्या प्रार्थनेत समाविष्ट करावा एवढंच आपल्या पूर्वजांचं सांगणं आहे!
अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम्।देहान्ते तव सानिध्यं देहि मे परमेश्वर॥