१० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे आणि प्रदोष व्रत शुक्रवारी आल्यामुळे शुक्र प्रदोष करायचे आहे. धनत्रयोदशीला आपण धन्वंतरी, धनलक्ष्मीची पूजा करतोच, त्याबरोबर प्रदोष व्रत असल्याने महादेवाची पूजा करणे इष्ट ठरेल.
प्रदोष व्रत दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि त्रयोदशीला येते. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी प्रदोष व्रत शुक्रवारी येत आहे. म्हणून याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाईल. या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवन समृद्ध होते. हे व्रत सूर्यास्ताच्या सुमारास करायचे असते. त्यालाच संधिप्रकाश काळ म्हणतात. या तासाभरात प्रदोष व्रत पूजा केली जाते. केवळ फळे, फुले, धूप-दीप इत्यादींनी पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात, असे शास्त्रात सांगितले आहे. त्याचबरोबर शिवकृपा प्राप्त होण्यासाठी अन्य उपायही सांगितले आहेत, ते जाणून घेऊया-
>> शुक्रवार देवीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी लाल, गुलाबी आणि पांढरे फुल देवीला वाहता येईल. ज्यांना विवाह ठरण्यात अडचण येत आहे त्यांनी यादिवशी शंकराला अभिषेक घालून पत्र, पुष्प, अत्तर लावून मनोभावे पूजा करावी.
>> ज्यांच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत, वादावाद आहेत अशा दाम्पत्यांनी शुक्र प्रदोषाच्या मुहूर्तवार शिव पार्वतीची पूजा आवर्जून करावी. तसेच साधकाने ओम नमः शिवाय आणि ओम उमामहेश्वराभ्यं नमः या मंत्राचा जप करावा.
>> विवाहित जोडप्याने शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला लाल किंवा पांढऱ्या फुलांच्या माळा अर्पण कराव्यात. ही पूजा शक्यतो एकत्र करून शिव पार्वतीच्या आशीर्वादाने नात्यातला गोडवा जपण्याचा प्रयत्न करावा आणि शिवपार्वतीचा आदर्श ठेवावा.
>> शिवाला भस्म प्रिय असल्याने पुरोहितांच्या संमतीने शिवलिंगाला भस्मलेपन करावे आणि शिवस्तोत्र गावे. या पूजेने मानसिक शांतात मिळते. तसेच दैनंदिन अडचणींमधून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते.
>> प्रदोष व्रताच्या दिवशी शिव आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करावी. तसेच ओम गौरीशंकराय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यासोबतच जीवनात सुख-समृद्धी येते.