Diwali 2023 Laxmi Puja Sahitya: दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे म्हटले जाते. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. घर असो किंवा कार्यालय असो; दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठे महत्त्व आहे. अनेक ठिकाणी दिवाळीच्या खरेदीसह लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य घेतले जाते. अनेक घरांमध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी पूर्णही झाली असेल. मात्र, तरीही काही गोष्टी राहात नाहीत ना, याची खात्री करून घ्यावी. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे आवश्यक पूजा साहित्य कोणते? लक्ष्मीपूजनाची तयारी कशी करावी? जाणून घ्या...
यंदा सन २०२३ मध्ये रविवार, १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजन प्रदोषकाळी केले जाते. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सुख, समृद्धीत वृद्धी होते, अशी मान्यता आहे.
लक्ष्मीपूजन करतानाचे काही नियम
आपापले कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे लक्ष्मीपूजन केले जात असले तरी लक्ष्मी देवीची पूजा करताना काही संकेत, नियम पाळणे आवश्यक असते, असे सांगितले जाते. लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवीच्या दोन मूर्त्या कधीही ठेवू नये. लक्ष्मीपूजनावेळी केवळ लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करू नये. लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करावी. लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर नेहमी हसमुख स्वरुपाची असावी. दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी, सरस्वती आणि गणपती यांची स्थापना केली जाते. पूजनावेळी लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा तसबीर योग्य दिशेला स्थापन करावी, असे सांगितले जाते.
लक्ष्मीपूजनासाठी लागणारे आवश्यक साहित्य
लक्ष्मीपूजनात देवी आणि गणपती बाप्पाच्या मूर्ती किंवा तसबिरीसह हळद-कुंकू, अक्षता, विड्याचे पान, सुपारी, श्रीफळ, लवंग, वेलची, धूप, कापूर, अगरबत्ती, दीपक, कापूस, धागा, पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर), गंगाजल, गुळ, धने, ऋतुकालोद्भव फळे, फुले, जव, गहू, दूर्वा, चंदर, शेंदूर, सुकामेवा, लाह्या, बत्तासे, यज्ञोपवीत, वस्त्र, अत्तर, चौरंग, कलश, कमल पुष्प माला, शंख, आसन, पूजाथाळी, चांदीची नाणी, आंब्याची डहाळी, नैवेद्य, असे पूजा साहित्य लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक मानले गेले आहे. बाकी साहित्य आपापल्या परंपरांनुसार घ्यावे.