Diwali Lakshmi Pujan 2023: समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडिले। विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमश्वमेव॥ समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाल्याचे म्हटले जाते. प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. घर असो किंवा कार्यालय असो; दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठे महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे? सन २०२३ मध्ये लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? लक्ष्मी पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या...
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. लक्ष्मी पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते. लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवीच्या दोन मूर्त्या कधीही ठेवू नये. लक्ष्मीपूजनावेळी केवळ लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करू नये. लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करावी. लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर नेहमी हसमुख स्वरुपाची असावी. दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी, सरस्वती आणि गणपती यांची स्थापना केली जाते. पूजनावेळी लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा तसबीर योग्य दिशेला स्थापन करावी, असे सांगितले जाते.
दिवाळी लक्ष्मीपूजनः रविवार, १२ नोव्हेंबर २०२३
अश्विन अमावस्या प्रारंभ: रविवार, १२ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०२ वाजून ४४ मिनिटे.
अश्विन अमावास्या समाप्ती: सोमवार, १३ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०२ वाजून ५६ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली, तरी लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळी करणे शास्त्रसंमत असल्यामुळे रविवार, १२ नोव्हेंबर २०२३ रोजी ते करावे, असे सांगितले जात आहे. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी ०५ वाजून ५९ मिनिटे ते रात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे असा आहे.
दिवाळी लक्ष्मीपूजन विधी
लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक कलश घेऊन त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी देवीच्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. लक्ष्मी देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. पूजेचे सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मंत्र किंवा 'ॐ महालक्ष्म्यै नम:' मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी. यानंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकले असल्यास क्षमायाचना करावी.
महानिशिथ काळ आणि तांत्रिक लक्ष्मी पूजा
तंत्रशास्त्रात दिवाळीच्या रात्रीचे अधिक महत्त्व आहे. या कालावधीत देवीची शक्ती जागृत होते, असे मानले जाते. या कालावधीत तांत्रिक, मांत्रिक आणि साधक देवीची उपासना करतात. यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. महानिशिथ काळ रात्रौ ११ वाजून ३९ मिनिटे ते मध्यरात्रौ १२ वाजून ३१ मिनिटे असेल. सिंह काल रात्रौ १२ वाजून १२ मिनिटे ते मध्यरात्रौ ०२ वाजून ३० मिनिटे असून, या कालावधीत साधना करणे लाभदायक ठरेल.