Diwali Lakshmi Pujan 2023: दिवाळीत धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला अत्याधिक महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. लक्ष्मीपूजनासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या देवीच्या मूर्तीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. यामध्ये लक्ष्मी देवीची मूर्ती कशी असावी, कशी नसावी, त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात, त्यातून काय लाभ किंवा फायदे मिळू शकतात, याविषयी जाणून घ्या...
सन २०२३ रोजी रविवारी, १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. यात दिवशी नरक चतुर्दशी आहे. वास्तुशास्त्रात, कोणत्याही देवतेचे पूजन करताना त्याची योग्य दिशा कोणती असावी, याबाबत सविस्तर विवेचन केल्याचे पाहायला मिळते. दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी, सरस्वती आणि गणपती यांची स्थापना केली जाते. पूजनावेळी लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा तसबीर योग्य दिशेला स्थापन करावी, असे सांगितले जाते.
लक्ष्मीदेवीची मूर्ती कशी नसावी?
लक्ष्मी देवीची मूर्ती नेहमी बसलेल्या स्वरुपात असावी. लक्ष्मी देवी उभ्या स्वरुपात असता कामा नये, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. लक्ष्मी देवीची तसबीर घरात आणायची असेल, तर लक्ष्मी हातातून धनवर्षा होत असलेल्या तसबिरीला प्राधान्य द्यावे. मात्र, लक्ष्मी देवीच्या हातातून पडणारी सोन्याची नाणी एखाद्या पात्रात पडतानाची तसबीर असावी. लक्ष्मी देवीच्या हातातून पडणारी सोन्याची नाणी जमिनीवर पडताहेत, अशा स्वरुपाची लक्ष्मी देवीची तसबीर नसावी, असे सांगितले जाते. सोन्याची नाणी पडतानाच्या लक्ष्मी देवीच्या तसबिरीमुळे आपल्याला होणाऱ्या धनलाभाचे प्रमाण वाढू शकते, असे सांगितले जाते.
‘अशी’ असावी लक्ष्मीदेवीची मूर्ती
लक्ष्मीपूजनावेळी केवळ लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करू नये, असे म्हटले जाते. लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करावी. असे केल्याने व्यक्तीला धन आणि विद्या दोन्हीची प्राप्ती होऊ शकेल. तसेच लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांचे एकत्रितरित्या केलेले पूजन अत्यंत कल्याणकारी ठरू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. याशिवाय लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर नेहमी हसमुख स्वरुपाची असावी. लक्ष्मी देवीची क्रोध मुद्रा असलेली मूर्ती किंवा तसबीर कधीही घरी आणू नये. असे केल्याने मोठा तोटा तसेच आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
श्रीविष्णू, लक्ष्मी देवी अन् गणपती बाप्पा
लक्ष्मी देवीसह गणपती बाप्पा असलेल्या तसबिरीला प्राधान्य द्यावे. तसेच या प्रकारच्या तसबिरीत श्रीगणेश लक्ष्मी देवीच्या उजव्या हाताला बसलेले असावेत. लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णूंच्या तसबिरीत लक्ष्मी देवी श्रीविष्णूंच्या डाव्या बाजूस असावी, याचे भान ठेवावे. सर्वांना सोने-चांदीची मूर्ती घरी आणणे शक्य नसते. अशावेळी पितळ किंवा अष्टधातूची मूर्ती घरी आणावी. असे केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद मिळतात. धन-धान्याची कमतरता भासत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.