हिंदू सणांमध्ये बली प्रतिपदा या सणाला फार महत्त्व आहे, कारण आपल्या संस्कृतीत त्यागाचा महत्त्व अधिक आहे आणि बळीराजा हा दैत्य असूनही त्याचे दातृत्त्व अनुकरणीय आहे. त्याच्या नावावरून या दिवसाचे महत्त्व कसे वाढले ते पाहू.
दैत्यराजा बळी हा नावाप्रमाणे बलवान होता. मात्र तो जसा महाप्रतापी तसाच परमदयाळूदेखील होता. आपल्या प्रजेवर त्याचे अपत्याप्रमाणे प्रेम होते. प्रजेच्या सुखासाठी तो सदैव दक्ष असे. विष्णूचा परमभक्त असलेल्या प्रल्हादाचा हा नातू.
या बळीने तपश्चर्या करून त्या सामर्थ्याच्या बळावर स्वर्गदेखील जिंकला. त्याने प्रल्हादाला ते स्वर्गाचे राज्य देऊ केले. परंतु प्रल्हादाने बळीलाच राजगादीवर बसवले. त्यावेळी `धर्माने राज्य कर' असा उपदेशही केला. बळीने स्वर्ग जिंकल्याने देव घाबरून आपली रूपे बदलून स्वर्गापासून दूर गेले होते. एवढा हा पराक्रमी होता.
बळीने आपल्या आयुष्यातील शेवटचा अश्वमेध केला त्यावेळी ती संधी साधून इंद्राने विष्णूंना बळीचा बीमोड करण्याची विनंती केली. कारण तो यज्ञ पूर्ण झाला असता त्या यज्ञाच्या पुण्याईने बळीराजाला इंद्रपद मिळाले असते आणि त्याच्या राज्यात देवांना असुरक्षित वाटले असते. म्हणून भगवंतांनी वामनावतार धारण करून बटुवेषात बळीकडे जाऊन तीन पावले ठेवता येतील एवढी जमीन मागितली.
दातृत्वाबद्दल ख्याती असलेल्या बळीने बटूची इच्छा मान्य केली. त्याबरोबर विष्णूने भव्यरूप धारण करून दोन पावलांमध्ये त्रिभूवन व्यापून तिसरे पाऊल बळीच्या सांगण्यावरून त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात ढकलले. मात्र बळीची भक्ती आणि दातृत्व ही तिथी तुझ्या नावाने बलिप्रतिपदा म्हणून ओळखली जाईल, असा वर दिला.
बळीच्या प्रजाप्रेमाचे द्योतक म्हणून या दिवशी समाजाभिमुख अशा कार्याचा प्रारंभ केला जातो आणि इडापिडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो असे म्हटले जाते.