Diwali 2024 Lakshmi Pujan 2024 Date And Time:चातुर्मासातील अखेरचा शेवटचा मोठा सण आणि उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळी सण आणि उत्सव अशा दोन्ही स्वरुपात साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील वद्य द्वादशी वसुबारस ते कार्तिक महिन्यातील शुद्ध द्वितीया भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. वसुबारस, गोवत्स द्वादशीनंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सणांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यदायी महत्त्वही अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या तारखेबाबत तसेच मुहूर्ताबाबत संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे. लक्ष्मीपूजन नेमके कधी करावे? लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घेऊया...
दिवाळीला २८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. २८ ऑक्टोबर रोजी वसुबारस, २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, ३१ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, २ नोव्हेंबरला बलिप्रतिपदा तर ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. यंदा मात्र लक्ष्मीपूजन अमावास्या प्रदोषात असताना सांगितले असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमांत फिरत आहेत. नेमके लक्ष्मीपूजन कधी करावे, याबाबत धर्मशास्त्र काय सांगते? ते जाणून घेऊया...
अश्विन अमावास्या प्रारंभ, सांगता आणि लक्ष्मीपूजन
३१ ऑक्टोबर रोजी चतुर्दशी समाप्ती दुपारी ३ वाजून ५३ वाजता होत असून, त्यानंतर अमावास्या सुरू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ०१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून १७ वाजता अमावास्या समाप्त होत आहे. ३१ ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावास्येची अधिक व्याप्ती असून, दुसऱ्या दिवशी ०१ नोव्हेंबर रोजी अमावास्या प्रदोष काळात अल्प काळ असताना लक्ष्मीपूजन सांगितले आहे. त्यामुळेच संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, सूर्यास्त समयी प्रदोष काळात स्पर्श असलेली अमावास्या आणि सूर्यास्ताच्या पूर्वी गौण प्रदोष काळात असलेल्या तसेच प्रतिपदायुक्त अशा अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणे फलदायी असते, असे मानले जाते.
धर्मशास्त्रात नेमके काय म्हटले आहे?
धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणि, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इ. ग्रंथांमधील वचनांचा विचार करून दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावास्येची कमी-अधिक व्याप्ती असता दुसरे दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे आहे. ‘परदिने एव दिनद्वयेपि वा प्रदोषव्याप्तौपरा। पूर्वत्रैव प्रदोषव्याप्तौ लक्ष्मीपूजनादौ पूर्वा।’, असे धर्मसिंधु ग्रंथात म्हटले आहे. तर, ‘प्रदोषव्यापिनी ग्राह्या, दिनद्वये सत्त्वाऽसत्त्वे परा।’, असे तिथिनिर्णय ग्रंथात म्हटले आहे. ‘यदा सायाह्ममारभ्य प्रवृत्तोतरदिने किंचिन्न्यूनयामत्रयम् अमावास्या शच तदुत्तरदिने यामत्रयमिता प्रतिपत्तदाऽमावास्याप्रयुक्तः दीपदानलक्ष्मीपूजादिकं पूर्वत्र। यदा तु द्वितीयदिने यामत्रयममावस्या तदुत्तरदिने सार्धमात्रयं प्रतिपत्तदा परा।’, असे पुरुषार्थ चिंतामणि या ग्रंथांत म्हटले आहे. अर्थात् अमावास्या तीन प्रहरानंतर संपत असेल आणि प्रतिपदा साडेतीन प्रहरानंतर संपत असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनादि करावे. प्रदोषकाळात अमावास्येची कमी व्याप्ती असताना त्या दिवशी सायाह्मकाळी व प्रदोषकाळी अमावास्या मिळत आहे. तसेच अमावास्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने प्रतिपदायुक्त अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे आहे. युग्मास महत्त्व द्यावे असे वचन असल्याने या सर्व वचनांची संगती लावून ०१ नोव्हेंबर, २०२४ रोजी शुक्रवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर अमावास्या प्रदोषकाळात अल्पकाळ असली तर तरी सायाह्य काळापासून प्रदोषकाळ समाप्तीपर्यंत म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल.
सन २०२४ मधील दिवाळी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त नेमका कधी?
लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त ०१ नोव्हेंबर रोजी सूर्यास्तानंतर अमावास्या प्रदोष काळात अल्प काळ असली, तरी सायंकाळपासून प्रदोषकाळ समाप्तीपर्यंत म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल. लक्ष्मीपूजनासाठी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटे तसेच सायंकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजून ३५ आणि रात्री ९ वाजून १० मिनिटांपासून ते १० वाजून४५ मिनिटांपर्यंत मुहूर्त सांगितले आहेत.
दरम्यान, यापूर्वी १९६२, १९६३ आणि २०१३ मध्ये अमावास्या प्रदोषात अल्प काळ असतानाही अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यात आले होते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.