साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर===============सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा आरामाचा असणार आहे. तुम्ही पूर्वी बरेच श्रम केले आहेत, आता दिवाळीत तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. तुम्हाला तुमचा स्वतंत्र वेळ मिळेल, या निवांतपणात तुम्ही आत्मपरीक्षण करू शकाल. ही दिवाळी तुमच्यासाठी निवांतपणा घेऊन येत आहे, त्यामुळे "आनंदी आनंद गडे" असा अनुभव तुम्हाला येईल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही स्वार्थ सोडून इतरांचा देखील विचार करण्याची गरज आहे. हा वेळ स्वतः मध्ये सुधारणा करण्यासाठी वापरा. जरी तुमच्याकडे चांगली संपन्नता असली तरी वस्तूंचा अतिवापर करू नका. गरजेपुरताच वापर करा. आनंद उपभोगताना अत्यंत विनम्र रहा. दिवाळीत दिमाखात साजरी करा, पण दिखावेपणा करू नका!
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी परीक्षेचा असणार आहे. तुमचा संयम, तुमचा सात्विक भाव आणि तुमची सचोटी या गोष्टींना धक्का लागण्याचे प्रसंग येऊ शकतात. कामे रखडली जातील. काही प्रमाणात हतबल झाल्यासारखं वाटू शकतं. पण दिवाळीच्या शेवटी चांगले बदल घडतील. येणार्या पहाटेसाठी आजची रात्र गरजेचीच असते हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही स्वतःला कणखर बनवण्याची गरज आहे. कुठल्याही आमिषाला भुलू नका. लाचारी पत्करू नका. सात्विक मनाला योग्य वाटत नसेल ते काम अजिबात करू नका. कोणतेही नियम मोडू नका. जोखीम उचलू नका. व्यसनात गुंतू नका. अती तिथे माती हे लक्षात ठेवा! ही दिवाळी तुम्हाला आत्मसंयम ठेवायला सांगते आहे!
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी वेगवान असणार आहे. अडकलेली कामे पुढच्या टप्प्यापर्यंत पोचू शकतात. ध्येयाकडे चांगली वाटचाल होईल. सतत होत असलेल्या घडामोडींमुळे अस्थिर आणि अस्वस्थ वाटू शकतं. सडेतोड बोलणाऱ्या व्यक्तींशी सामना होईल. मतभेद होऊ शकतात. ही दिवाळी तुमच्या कामांना गती आणि प्रगती देणार आहे!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही धडाडीने आणि विश्वासाने पुढे चालण्याची गरज आहे. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा, रोखठोक वागा. सत्याचीच बाजू घ्या. बुद्धीचातुर्य वापरा. कोणत्याही बाबतीत वेळ गाठा, विलंब नको. दिवाळीच्या काळात संथ न होता, आहात त्या मार्गावर "तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची!" याप्रमाणे वागलात तर यश निश्चितपणे मिळेल!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.