जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा एक लहान मुलगा. त्याचे वडील एका गाडीच्या शोरूम मध्ये कामाला होते. तिथे त्यांना रोज गाड्यांची साफसफाई करणे हे काम असे. तो मुलगा एकदा आपल्या बाबांबरोबर त्यांच्या शोरूममध्ये जाऊन आला. तिथल्या आलिशान आणि चकचकीत गाड्या त्याच्या इवल्याशा डोळ्यात सामावल्या नाहीत, पण मनात घर करून गेल्या.
एक दिवस शाळेत बाईंनी 'माझे स्वप्न' या विषयावर निबंध लिहायला सांगितला. सगळ्या मुलांनी दुसऱ्या दिवशी निबंध लिहून वही तपासायला दिली. कोणाला १० पैकी ८, तर कोणाला ७, कोणाला ९ असे मार्क मिळाले. मात्र या मुलाच्या निबंधावर लाल पेनाने फुली मारून १० पैकी शून्य मिळाला होता. त्या मुलाने जाऊन बाईंना विचारले, 'बाई मला शून्य मार्क का?'त्यावर बाई म्हणाल्या, 'तुम्हाला स्वप्न लिहा सांगितलं होतं, चमत्कार नाही! तू तुझ्या निबंधात जी कल्पना मांडली आहेस, आलिशान घर, आलिशान गाडी ही स्वप्नं नसून हा चमत्कार आहे आणि तो तुझ्या बाबतीत घडणे शक्य नाही. म्हणून स्वप्न आपल्या कुवतीनुसार पहावीत!'
वर्गातली सगळी मुले हसू लागली. मुलाला गहिवरून आले. घरी येऊन त्याने तो निबंध आपल्या आई बाबांना वाचून दाखवला व म्हणाला, 'मी काही चुकीचं लिहिलं आहे का? बाई म्हणतात हे स्वप्न पूर्ण होणार नाही.'
हे ऐकून आईने मुलाला पोटाशी धरत म्हटलं, 'बाळा या जगात अशक्य काहीच नाही. आज तुझे बाबा रोज आलिशान गाड्या पाहतात, उद्या तू या गाड्यांमधून फिरशील. फक्त हा चमत्कार घडायला आणि तुझं स्वप्नं साकार व्हायला तुला खूप अभ्यास करावा लागेल, खूप कष्ट करावे लागतील. मग एक दिवस तुझं हे स्वप्नं नक्की पूर्ण होईल.' बाबांनींही बोलण्याला दुजोरा दिला. तो मुलगा आनंदाने आई बाबांच्या कुशीत विसावला. त्याने ते स्वप्न साकार करण्यासाठी कसून मेहनत केली. शिक्षण घेतले, नाव कमावले, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आणि काही काळातच तो एका आलिशान गाडीचा मालक बनला. त्या गाडीतून त्याने आई बाबांना सैर घडवली आणि आपले स्वप्न सत्यात उरतवले!
जर आपणही असे एखादे ध्येय उराशी बाळगले असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा आणि त्यासाठी भरपूर परिश्रम घ्या, म्हणजे तुमचेही स्वप्न सत्यात अवश्य उतरेल.