ज्योत्स्ना गाडगीळ
संतांनी आपल्याला नेहमी परोपकाराची शिकवण दिली आहे. ते सांगतात, 'नेकी कर और दर्या में डाल' म्हणजेच हातून घडलेल्या सत्कार्याची मोजदाद ठेवत बसू नकोस. समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सामावलेल्या असंख्य जलबिदूंचा हिशोब ठेवत नाही, त्याप्रमाणे मनुष्यानेसुद्धा सत्कार्य करत राहावे. सत्कार्याची थोडक्यात व्याख्या सांगायची, तर सत्कार्य म्हणजे दुसऱ्याला मदत, परोपकार. मात्र, ते करत असताना, मनाला अहंकार चिकटलेला नसावा. याबाबत एक सुभाषितकार सांगतात,
अष्टादशपुराणानां सारं सारं समुद्धृतम् परोपकार: पुण्याय पायाय परपीडनम्
अठरा पुराणांचे एकच सार काढले आहे. ते हे की, परोपकाराने पुण्य लाभते आणि परपीडेने पाप लाभते. संत तुकाराम महाराजांनीदेखील आपल्या अभंगात परोपकाराची महती सांगतात,
पुण्य परउपकार पाप ते परपीडा,आणिक नाही जोडा दुजा यासी
पं. भिमसेन जोशी यांच्या सुस्वरात आपण हा अभंग अनेकदा ऐकला असेल. तुकोबाराय या अभंगातून पापपुण्याची व्याख्या सांगतात, दुसऱ्याला मदत करणे म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला दुखवणे म्हणजे पाप.
हेही वाचा : तुम्ही कुठे राहता?.....'भ्रमात!'
माणसाने परोपकार करावा. त्यातच त्याचा पुरुषार्थ आहे, असे लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात म्हटले आहे. दुसऱ्याला मदत करणे, संकटप्रसंगी दुसऱ्याच्या साह्याला धावून जाणे हे परोपकार सदरात मोडेल. परंतु हा परोपकार निरपेक्षवृत्तीने झाला पाहिजे.
नद्या स्वत:च स्वत:चे पाणी पीत नाहीत. झाडे आपली फळे स्वत: खात नाहीत. मेघ स्वत:मुळे निर्माण झालेले धान्य खात नाहीत. ही उदाहरणे देऊन सुभाषितकार निष्कर्ष काढतो, `परोपकाराय संत विभूतय:' महान संतसज्जनांचा जन्म हा परोपकार करण्यासाठीच असतो. सावरकरांनी स्वातंत्र्ययज्ञामध्ये उडी घेऊन जन्मभर हालअपेष्टा सहन केल्या. त्यांच्यासारखा त्याग केलेले स्वातंत्र्यवीर क्वचितच! गांधींनी देशासाठी आपल्या संसाराचा त्याग केला. टिळकांनी नि:स्वार्थ बुद्धीने ब्रिटिशांशी काया-वाचा-मनाने लढा दिला. या परोपकारांची पातळी उच्च होती. भारतीय जनतेने त्याची परतफेड करावी अशी या त्यागामागे त्यांची जरादेखील अपेक्षा नव्हती. कारण, त्यांनी हे परोपकार हेतुपुरस्सर केले नव्हते, तर कर्तव्यभावनेतून केले होते.
सर्वसाधारणपणे आपणही परोपकार करतो. कर्तव्यबुद्धीने करतो. परंतु, स्वार्थ परमार्थ दोन्ही साधले जावेत अशी दक्षता घ्यायचे मात्र आपण विसरत नाही. बरेचसे लोक वाममार्गाने पैसा कमावतात आणि तो तिरुपतीच्या पेटीत टाकतात. व्यापारी दीड दांडीचा तराजू वापरून गिऱ्हाईकाला फसवतो, टॅक्स चुकवतो आणि दानधर्मही करत बसतो. इतरांचे भले करण्यासाठी पापाची कमाई खर्च करणे, हा परोपकार ठरेल का? दुसऱ्याला फसवून कमावलेला पैसा दानधर्मात जोडल्याने तो शुद्ध होत नाही. तो पापाचाच पैसा आहे आणि तो कधीच लाभत नाही. पुण्य निष्पाप, नि:स्वार्थ, निरपेक्ष असावे लागते. तीच पुण्याची कसोटी आहे.
सिकंदर बादशहा जग जिंकायच्या उद्देशाने निघाला. भारतात आला. हिमालयातील साधूंचे जीवन पाहून त्याला कमालीचे आश्चर्य वाटले. सकाळच्या वेळी एका साधूच्या झोपडीच्या दारात उभे राहून तो साधूला म्हणाला, `मी जग जिंकलेले आहे. तुझे मी काय भले करू?' साधू शांतपणे म्हणाला, `राजा, तुला माझे भले करायचे आहे का? मग जरा दारातून तू बाजूला हो. तुझ्यामुळे झोपडीत येणारे ऊन अडले आहे.' याचा अर्थ काय? तर तुझ्या अहंभावनेतून परोपकार नको, याचक कितीही असो, परंतु दात्याच्या ठायी अहंभाव नसावा. परोपकार पुण्यप्रद होण्यासाठी तो निष्पाप असणेही गरजेचे आहे. सर्वांचे भले व्हावे, ही सदिच्छा मनात ठेवून केलेले कार्य परोपकार ठरते. तेच करण्याचा आपणही प्रयत्न करूया.