ज्योत्स्ना गाडगीळ
तुम्हाला ते राज कपूर यांचे गाणे आठवते का, `एक दिन बित जाएगा, माती के मोल, जगमे रह जाऐंगे, प्यारे तेरे बोल, दुजे के होठो को, देकर अपने गीत, कोई निशानी छोड, फिर दुनियासे डोल...' आठवले ना? हिंदी, मराठी सिनेमात अशी अनेक आशयघन गाणी आहेत. मात्र, आपण फक्त त्याच्या सुरावटीत रमतो. त्या शब्दांकडे बारकाईने लक्ष दिले, तर सिनेसंगीत वाटणारी गाणी संत वाङमयाशी साधर्म्य साधताना दिसतील. तसेच हे गाणे ऐकताना, समर्थ रामदास स्वामी यांचा मनातील श्लोक संग्रहातला श्लोक आठवतो,
देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, अकस्मात तेचि क्रीया धरावी,मना चंदनाचे परित्वा झिजावे, परि अंतरी सज्जना नीववावे।।
ज्याप्रमाणे चंदनाचे खोड सहाणेवर झिजत असतानाही, सुगंधी परीमळ देऊन जातो, तसाच मनुष्याने इहलोकीची यात्रा संपवण्याआधी आपल्या सत्कर्माचा परिमळ मागे दरवळत ठेवला पाहिजे. हेच सांगणारी बोधकथा-
अरब आणि रोमन यांच्यात घनघोर लढाई झाली. दोन्ही बाजूचे अनेक योद्धे मारले गेले. बरेच जखमी झाले. संध्याकाळ झाली की लढाई थांबवायची असा लढाईचा नियम होता.
हेही वाचा : एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...
एक दिवस संध्याकाळी लढाई थांबवल्यानंतर अरबांच्या सैन्यातील एक तरुण आपल्या चुलतभावाला शोधायला निघाला. भाऊ जखमी झाला असेल, तर त्याला औषधपाणी करावे, असे त्याला वाटत होते. आपल्या भावाला तहान लागली असेल आणि पाण्याविना तो व्याकुळ झाला असेल, असे त्याला वाटले, म्हणून जाताना त्याने तांब्याभर पाणी घेतले. कदाचित तो मृत्यू पावला असेल, तर त्याचे दफन करावे, अशा अनेक विचारांनी तो पुनश्च रणभूमीवर गेला.
एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या घेऊन तो समरांगणावर पोचला. जखमी योद्धे आणि मृत शरीरे यांच्यात फिरत तो आपल्या भावाचा शोध घेऊ लागला. थोड्या वेळात त्याला आपला भाऊ सापडला. त्याच्या शरीरावर खोल जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होते. त्याला फार तहान लागली होती आणि कह्णत तो पाण्याची याचना करत होता. तो वाचण्याची शक्यता नव्हती.
अरबाने कंदील खाली ठेवला आणि तांब्या दोन्ही हातात घेऊन त्याला पाणी पाजणार इतक्यात दुसऱ्या जखमी शिपायाचे कह्णने त्याला ऐकू आले. `पाणीऽऽऽ!' अरबाचा जखमी भाऊ मोठ्या प्रयासाने त्याला म्हणाला, `त्या जखमी शिपायास आधी पाणी पाज, नंतर मला दे.' एवढे बोलून त्याने आपले तोंड बंद केले.
जिथून आवाज आला, त्या दिशेने अरब जाऊ लागला. जवळ जाऊन पाहिले, तर तो जखमी, एक मोठा सरदार होता. अरब त्याला पाणी पाजण्यासाठी वळला, तर तिसरीकडून आवाज आला, `पाणीऽऽऽ!'
सरदार फार जखमी झाला होता. मोडके-तोडके शब्द आणि खुणांच्या आधारे त्याने त्या अरबास सांगितले, की त्या तिसऱ्या शिपायाला पाणी मिळाल्याशिवाय मी पाणी पिणार नाही. बिचारा अरब बुचकळ्यात पडला. एक क्षणही दवडणे शक्य नव्हते. तो झपाट्याने पाणी मागणाऱ्या तिसऱ्या योद्ध्याच्या दिशेने जाऊ लागला. पण जेव्हा तो त्या पाणी मागणाऱ्या तिसऱ्या योद्ध्याजवळ पोहोचला आणि त्याला पाणी पाजू लागला, इतक्यात त्या योद्ध्याने कायमचे डोळे मिटले.
तो अरब धावत-धावत त्या सरदाराजवळ आला. तो सरदार मरण पावला होता. अरबाच्या दु:खाला पारावार राहिला नाही. दु:खी मनाने परमेश्वराचे नाव घेत तो आपल्या भावाजवळ आला. तर त्यानेही इहलोकीची यात्रा संपवली होती.
या तिन्ही योद्ध्यांपैकी कुणालाच पाणी मिळाले नाही, परंतु पहिले दोन योद्धे मानवतेच्या इतिहासात आपले नाव अमर करून गेले.