हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावास्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. अमावास्येला चंद्र दर्शन होत नाही. तिलाच दर्श अमावस्या असेही म्हणतात. ३१ जानेवारी रोजी सोमवती अमावस्या आहे. मात्र ही तिथी दोन दिवसांत विभागून आल्याने अनेकांना त्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. जाणून घ्या त्याबद्दल सविस्तर माहिती!
जी तिथी ज्या दिवशीचा सूर्योदय पाहते, त्या दिवशी ती तिथी ग्राह्य धरली जाते. त्यानुसार ३१ जानेवारी रोजी येणारी अमावस्येची तिथी दुपार पासून सुरू होऊन मंगळवारचा सूर्योदय पाहणार असल्याने दिन दर्शिकेतही मंगळवारी अमावस्या दर्शवली आहे. असे असूनही अमावस्येच्या तिथीचा प्रारंभ सोमवारी झाल्यामुळे ती सोमवती अमावस्या म्हटली गेली आहे. त्यामुळे भाविकांनी गोंधळून न जाता अमावस्येच्या कालावधीत व्रत आणि शिवपूजा करावी.
सोमवती अमावस्येला शिव पार्वतीची पूजा :
सोमवार हा भगवान शंकराचा. परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही. शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते. तसेच तुळशीचेदेखील पूजन केले जाते.
सोमवती अमावस्येचे महत्त्व :
सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृ पितृ सेवा केली असता दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत पितृ दोष दिलेला असेल, त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
पूजेचा विधी:
सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करून शिव शंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फुल, अक्षता वाहून पूजा करावी. धूप दीप दाखवावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत माळ ओढावी. दान धर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यथाशक्ती अन्न दान करावे.
पूजेचा शुभ मुहूर्त :
अमावस्या तिथि: ३१ जानेवारी, सोमवारसोमवती अमावस्येचा प्रारंभ: ३१ जानेवारी दुपारी २. १९ मिनिटांपासून सोमवती अमावस्येचे चे समापन: १ फेब्रुवारी सकाळी ११. १६ मिनिटांपर्यंत