हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. शनिवार हा न्यायाची देवता शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात. शनी देवाच्या आशीर्वादाने कुंडलीत शनि ग्रह बलवान होऊन शुभ परिणाम देऊ लागतो. चांगले जीवन मिळविण्यासाठी शनिदेवाची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे कारण शनिदेवाची नाराजी अनेक कार्यात बाधा आणते. शनी देवाची कृपा होण्यासाठी नेमके काय करता येईल ते जाणून घेऊया.
आयुष्य फक्त स्वतःसाठी न जगता इतरांसाठी सुद्धा जो जगतो, इतरांना मदत करतो, सेवा करतो त्याच्यावर शनी देवांची कृपा असते. विशेषतः आर्थिक अडचणीत सापडलेल्या निराधार लोकांना मदतीचा हात दिला असता शनी देव प्रसन्न होतात. तसेच वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध मंडळींची सेवा केली असता ती सेवा शनी देवाच्या चरणी रुजू होते असे म्हणतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
शनिवारी काही खास गोष्टी केल्या तर तुमच्यावर शनिदेवाची कृपा झालीच म्हणून समजा. या गोष्टी शनिशी संबंधित आहेत आणि शनिवारी त्यांचे दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते. त्या तीन गोष्टी पुढीलप्रमाणे -
सफाई कर्मचारी- शनिवारी एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्हाला सफाई कर्मचारी काम करताना दिसला तर ज्या कामासाठी तुम्ही निघाला आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शक्य असल्यास सफाई कामगाराला आवर्जून आर्थिक मदत करा.
भिकारी- गरजू आणि निराधार लोकांना मदत करणाऱ्यांवर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात. जर तुम्हाला शनिवारी अशी गरजू व्यक्ती दिसली तर तिला यथाशक्ती नक्कीच काहीतरी दान करा, असे केल्याने तुमच्यावर शनीची कृपा होईल. पैसेच दिले पाहिजेत असे नाही, अन्य कोणत्याही प्रकारे तुम्ही मदत करू शकता. मदतीचा सच्चा भाव महत्त्वाचा!
काळा कुत्रा- काळ्या कुत्र्याला शनिदेवाचे वाहन मानले जाते. शनिवारी जर तुम्हाला रस्त्यावर काळ्या कुत्र्याचे दर्शन घडले तर शनीची कृपा तुमच्यावर होणार आहे असे समजावे. काळ्या कुत्र्याला पोळी, भाकरी, बिस्कीट खायला द्या. ज्यांच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीत असतो, त्यांनी शक्य होईल तेव्हा पोळी, भाकरी कुत्र्यांना टाकावी, त्याचा उपयोग ग्रहदोष निवारणाकरीता होतो.