ज्योत्स्ना गाडगीळ
व्रत वैकल्य म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर आधी येते, पूजेची सगळी तयारी! पूजा सुरू करण्याआधीच अपुऱ्या तयारीमुळे व्रत बारगळते. परंतु, धर्मशास्त्रात काही साधी सोपी व्रतेही सांगितली आहेत. जी सहच अनुसरता येणार आहेत. जसे की पौष शुक्ल द्वितीया ते पौष शुक्ल पंचमी पर्यंत तीन दिवसीय करावयाचे विष्णुव्रत! फार सामग्री नाही की भरपूर कष्टही नाहीत. परंतु व्रताचे फळ नेत्रदीपक ठरणारे आहे. जाणून घेऊया आजपासून तीन दिवस करावयाचा, व्रतविधी.
हेही वाचा : संक्रांत आणि किंक्रांत यात फरक काय, जाणून घ्या!
विष्णुव्रत : भगवान विष्णूंसाठी जी खास अशी पाच व्रते सांगितली जातात, त्यापैकी एक व्रत हे पौष शुक्ल द्वितीया या तिथीला केले जाते. या तिथीला व्रतारंभ करावा. हे व्रत सलग चार दिवसांचे आहे. यामध्ये व्रतकत्र्याने चारही दिवस राई, तीळ, वेखंड आणि सर्वोषधी मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे. स्नान हा विधीचा एक भाग नसून पुजेआधी आपल्याला शुचिर्भूत झाल्याचा आनंद व्हावा, यासाठी सुचवले आहे. हात पाय स्वच्छ धुवून ईश स्मरण केले तरी चालू शकते. शेवटी भाव महत्त्वाचा! नंतर भगवान विष्णूंची द्वितीयेला कृष्ण, तृतीयेला अच्युत, चतुर्थीला हृषीकेश आणि पंचमीला केशव या नावांनी पूजा करावी. त्याचप्रमाणे रोज रात्री चंद्रकोरीची शशी, चंद्र, शशांक आणि निशापती या क्रमाने द्वितीयेपासून पंचमीपर्यंत रोज एक याप्रमाणे नामोच्चार करून पूजा करावी. तसेच याच नावांनी अर्घ्य द्यावे. रोज रात्री चंद्रप्रकाश असे पर्यंत अन्न ग्रहण करावे. शेवटच्या दिवशी म्हणजे पंचमीला आचार्यांना दक्षिणा द्यावी.
हे व्रत पूर्वी राजा दिलीप, दुष्यन्त, मरिची, च्यवन आदि ऋषींनी केले आहे. तसेच देवकी, सावित्री इ. स्त्रियांनीही केले आहे. ईप्सित प्राप्ती आणि पापनाशार्थ हे व्रत केले जाते.
धर्मशास्त्राने व्रतांची, सणांची, उत्सवाची आखणी आपल्याला निसर्गाशी जोडण्यासाठी केली आहे. सदर व्रतानुसार चंद्रदर्शन घेणे हाही त्याचाच एक भाग. शिवाय थंडीच्या दिवसात चंद्रप्रकाशात शेकोटी भोवती बसून सहभोजन करणे, हे तत्कालीन गेट टुगेदरच म्हणता येईल. पूर्वी आतासारख्या पार्ट्या होत नसत. शिवाय भेटीगाठींना निमित्तही लागत नसे. सण, वाराला एकत्र जमायचे, धार्मिक विधी करायचे, सहभोजन करायचे आणि सलोखा वाढवायचा, एवढाच प्रामाणिक हेतू असे. त्यानिमित्ताने गप्पा, गाणी आणि हरीनाम घेतले जात असे.
पूर्वीच्या या छान संकल्पना आपणही नव्याने रुजवण्याचा प्रयत्न करूया आणि विष्णुव्रताचा संकल्प सोडून विष्णुसहस्रनामाने सांगता करूया. तसेच चंद्रदर्शन घेत सात्विक भोजनाचा आस्वाद घेउन नात्यांमध्ये सुसंवाद घडवुया.