चाणक्य नीती महान मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली आहे. यामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्या आजही पूर्णपणे परिस्थितीला लागू पडतात. मग ते आयुष्यात यश मिळवण्यासाठी असो, नातेसंबंध जपण्यासाठी असो किंवा चांगल्या किंवा वाईट व्यक्तीची परीक्षा घेणे असो. चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्याही व्यक्तीशी भावनिक जवळीक साधण्याआधी काही गोष्टी तपासल्या पाहिजेत, अन्यथा ती व्यक्ती तुमची फसवणूक करून गंभीर नुकसान करू शकते.
आचार्य चाणक्य म्हणतात की ज्याप्रमाणे सोन्याला आगीत तावून सुलाखून काढले जाते त्याचप्रमाणे माणसाच्या काही गोष्टींची चाचणी घेणे आवश्यक आहे. ते चांगले की वाईट हे ठरवण्याचा हा मार्ग आहे. दुधाने तोंड भाजले की ताकही फुंकून प्यावे म्हणतात, ते यासाठीच!
आचरण : माणसाची वागणूक ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आचरणाने माणसाची सहज चाचणी होते. जर ती व्यक्ती सर्व वाईट सवयींपासून दूर राहिली, अनैतिक वागली नाही, इतरांबद्दल वाईट भावना मनात ठेवत नाही. अशी व्यक्ती नातेसंबंधात राहण्यास पात्र आहे. नसेल तर त्याच्यापासून दूर राहणेच बरे. याशिवाय खोटे बोलणाऱ्या, गर्विष्ठ आणि इतरांचा अपमान करणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
त्याग: चांगल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तो इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करतो. अशी व्यक्ती चांगली आणि सत्यवादी असते. त्याचबरोबर जो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे नुकसान करतो, त्याची कधीही साथ देऊ नका. भविष्यात तो तुमचे नुकसान करण्यासाठीही मागे पुढे पाहणार नाही.
कर्म: जर एखाद्या व्यक्तीची कृती वाईट असेल तर ती व्यक्ती स्वतः बरोबर इतरांनाही बुडवेल. त्यामुळे चुकीच्या मार्गाने पैसे कमावणाऱ्या किंवा वाईट काम करणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. नाहीतर त्याची वाईट सावली तुमचे मोठे नुकसान करेल.
या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी यावरून व्यक्तीचे चारित्र्य ओळखता येते. स्वार्थी माणसं फार काळ चांगला मुखवटा घालून वावरू शकत नाहीत. तो मुखवटा उतरेपर्यंत त्यांना जवळ करू नका. अन्यथा तुमचेच नुकसान होईल.