अनेकदा आपल्याला एकाच वेळी सगळ्या गोष्टी मिळाव्यात असा हव्यास सुटतो. याला एकावेळी अनेक दगडांवर पाय ठेवणे असेही म्हणतात. मात्र, त्याचा परिणाम असा होतो, की एकही गोष्ट आपल्याला नीट साध्य होत नाही. त्या अवस्थेला त्रिशंकू अवस्था होणे म्हणतात. धड इकडे ना तिकडे असा प्रकार झाला, एखाद्याला कुठेच नीट आश्रय नाही मिळाला, म्हणजे त्याची त्रिशंकूसारखी गत झाली, असे आपण म्हणतो. त्रिशंकूसारखी गत म्हणजे अधली मधली गत. त्रिशंकूची काय स्थिती झाली, हे समजण्याकरता त्रिशंकूची गोष्ट जाणून घेऊया.
इश्वाकू वंशात निबंधन नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या मुलाचे नाव होते सत्यव्रत. राजपुत्र सत्यव्रत उनाड निघाला. त्याने अनीतीने कामांध होऊन राज्यातील स्त्रियांवर अत्याचार करायला सुरुवात केली. तेव्हा निबंधन राजाने त्याला नगराबाहेर घालवून दिले. पुढे मोठा दुष्काळ पडला, तेव्हा पोट भरण्यासाठी सत्यव्रताने वसिष्ठ मुनीची गाय ठार मारली.
हेही वाचा :संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!
अशा रीतीने वडिलांचा राग अनीतीचे आचरण आणि वसिष्ठांच्या गायीचा वध, अशा तीन शंकूची टोचणी त्याला लागली, म्हणून त्याचे नाव त्रिशंकू पडले. पुढे त्रिशंकू सुधारला. निबंधन राजालाही त्याची दया आली आणि निबंधनानंतर त्रिशंकू राजा झाला. त्याला मानवी देहाने स्वर्गात जाण्याची इच्छा झाली. त्यासाठी यज्ञ करावा असा विचार त्याच्या मनात डोकावला. त्याने आपली इच्छा वसिष्ठांना बोलून दाखवली. त्यावर गुरु वसिष्ठ म्हणाले, `राजा, अनेक यज्ञ केल्यावर मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो. जिवंतपणी स्वर्गात जाण्याचे बेत मनातून काढून टाक.'
त्रिशंकूला वसिष्ठांचा राग आला. त्याने लगेच गुरु विश्वामित्रांना बोलावून घेतले. विश्वामित्रांना तपश्चर्येचा गर्व होताच. त्यांनी त्रिशंकूच्या इच्छापूर्तीसाठी यज्ञ केला. तेव्हा त्रिशंवूâ खरोखरच अधांतरी उडत जाऊ लागला. स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला. परंतु, कोणीतरी तिथे दबक्या आवाजात म्हणाले, `अशा पापी माणसासाठी स्वर्गाची दारे उघडणारी नाहीत.'
इंद्रदेवाला त्रिशंकूची घुसखोरी कळताच, तो त्रिशंवूâला खाली रेटू लागला. इंद्र स्वर्गात येऊ देईना, विश्वामित्र पृथ्वीवर येऊ देईना. त्यामुळे त्रिशंकू अंतराळात लोंबत राहिला. ना स्वर्ग ना पृथ्वी, अशी त्याची अवस्था झाली. तेव्हा विश्वामित्रांनी प्रति सृष्टी निर्माण केली अणि देवेंद्राने तडजोड केली. त्रिशंकूला दिव्य रूप देऊन त्याने स्वर्गात प्रवेश दिला.
राजमातेचा निरोप घेऊन दूत आल्यावर, राजधानीत परत जावे, की कण्वाच्या आश्रमाचे रक्षण करावे, की शकुंतलेचा सहवास मिळेल म्हणून वनात राहावे. याविषयी निर्णय न ठरून दुष्यंताने विदुषकाला सल्ला विचारला. त्यावर कालिदासाने विदूषकाच्या तोंडी वाक्य घातले आहे, 'त्रिशंकु: इव अंतरले तिष्ठ' अशा रीतीने त्रिशंकूला नाटकात आणि वाकप्रचारात मात्र अढळ स्थान मिळाले.
हेही वाचा : खरा गुरु कसा ओळखावा- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज