महाभारतात युद्धासाठी कुरुक्षेत्रावर सर्व तयारीनिशी पोहोचलेल्या अर्जुनाने ऐन वेळेस कच खाल्ली. आपलेच आप्तजन आपल्या विरुद्ध लढायला उभे पाहून भोवळ आली. हे युद्ध मी लढणार नाही असे तो म्हणाला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जो उपदेश केला, तो भक्त भगवंताचा संवाद म्हणजे भगवद्गीता. मात्र ती ऐकणारा अर्जुन एकटा तिथे उपस्थित नव्हता, तिथे आणखी दोन श्रोते होते, एक म्हणजे रथावर बसलेले हनुमान आणि दुसरे आकाशातून हा प्रसंग पाहणारे सूर्यदेव. सूर्यदेवांचा आकाशातला मुक्काम समजू शकतो, पण रामायण काळातले हनुमान महाभारातात कसे अवतीर्ण झाले, असा अनेकांना प्रश्न पडतो. ते चिरंजीवी आहेत, तरी महाभारताच्या युद्धाशी त्यांचा काय संबंध, हे अनेकांना माहीत नसते, त्याचे हे उत्तर.
महाभारत सुरू होण्याआधी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, की तुझ्या रथाचे सारथ्य मी करणार असलो तरी रथावर जी अस्त्र, शस्त्र आदळतील, त्यापासून संरक्षणासाठी रामदूत हनुमंताला शरण जा आणि त्यांना रथाचे रक्षण करण्याची विनंती कर. अर्जुनाने तसे केले, तेव्हा हनुमंत श्रीकृष्णांना म्हणाले जिथे भजन, पूजन, सत्संग असतो तिथेच मी थांबतो. जिथे राम नाही तिथे माझे काम नाही. श्रीकृष्ण म्हणाले, तुझी अट मी मान्य करतो. त्या वचनपूर्तीसाठी श्रीकृष्णाने हनुमानाला गीतामृतातून सत्संग घडवून आणला. म्हणून हनुमान रथावर थांबले. जेव्हा युद्ध पूर्ण झाले, तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला उतरण्याची विनंती केली, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले आधी तू उतर....
अर्जुन रथातून उतरला, मग श्रीकृष्ण उतरले आणि नंतर हनुमंतांनी रथावरून खाली उडी मारताच रथाचा स्फोट झाला आणि तो क्षणात भस्मसात झाला. हनुमंताच्या कृपेने सर्व आत्मघातकी शक्तींपासून अर्जुनाचा बचाव झाला होता. म्हणून अर्जुनाने हनुमंताला नमस्कार केला आणि हनुमंताने श्रीकृष्णाला नमस्कार करत म्हटले, 'भगवंता जिथे जिथे तुझे नामस्मरण, भजन, कीर्तन, सत्संग सुरू असेल तिथे तिथे उपस्थित राहण्याची मला संधी दे!' श्रीकृष्णाने तथास्तु म्हटले आणि मारुती रायाला तो कायमस्वरूपी आशीर्वाद मिळाला. म्हणून आजही कथा कीर्तनात एक रिकामा पाट मांडला जातो. त्यावर हनुमंत येऊन बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे!